करमाळा (बारामती झटका)
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची मुदत संपून गेली असून येणारा गळीत हंगाम सुरळीत व्हावा यासाठी आदिनाथची तात्काळ निवडणूक घ्यावी, अशी मागणी बचाव समितीचे निमंत्रक महेश चिवटे यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त पांडुरंग खंडागळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पुणे येथील सेंट्रल बिल्डिंगमधील सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये आयुक्त पांडुरंग खंडागळे यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार नाशिक कबीर, प्राध्यापक अशोकराव नरसाळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, कानड गल्ली शाखाप्रमुख अजय साने आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची मुदत संपून गेली आहे. नुकत्याच बचाव समितीने घेतलेल्या पुढाकारामुळे आदिनाथचा भाडेकरार रद्द होऊन हा कारखाना सहकारी मालकीचा राहिला आहे. यासाठी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी मोलाची मदत केली आहे.
हा साखर कारखाना सहकारी तत्त्वावरच राहावा यासाठी आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांनी बारा कोटी रुपयांची रक्कम कारखान्याला दिली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत या वर्षी आदिनाथने 76 हजार मॅट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. सर्व सभासदांना उसाचे रोख पेमेंट दिले असून वाहतूकदारांचे रोख पैसे दिले आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मंदिर असून या कारखान्याचा पुढील गळीत हंगाम सुरळीत होण्यासाठी तात्काळ निवडणुका होऊन नवीन संचालक मंडळ येणे आवश्यक आहे. यासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची तात्काळ निवडणूक झाली व नवीन संचालक मंडळ कार्यरत झाले तर नवीन इथेनॉल प्रकल्प कारखाना विस्तारीकरण व नवीन कर्ज बांधणी ही प्रकरणे मार्गी लागून आदिनाथचा भविष्यकाळ उज्वल होऊ शकतो.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जागेत सुमारे 200 व्यावसायिक गाळे विमा केल्यानंतर जवळपास 20 कोटी रुपयांची रक्कम कारखान्याला उपलब्ध होणार आहे. याशिवाय कारखान्याच्या मालकीची असलेली शंभर एकर जमीन एका कंपनीने भाडे कराराने मागितली आहे. या सर्व बाबींचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी नवीन संचालक मंडळ गरजेचे असून हे निर्णय तात्काळ घेतले गेले तर आदिनाथचा भावी काळ उज्वल होऊ शकतो.
निवडणुकीनंतर सत्ता कोणाचीही आली तरी चालेल मात्र, पुढील हंगामाची तयारी आतापासूनच सुरू झाली पाहिजे, यासाठी तात्काळ निवडणुका घ्या, अशी मागणी या निवेदनात जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे. तसेच बचाव समितीचे सदस्य दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन रामदास झोळ, माजी संचालक वसंतराव पुंडे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी तात्काळ निवडणूक घेण्याची मागणी केली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng