आमदार शिंदे बंधूंचा जुनी पेन्शन योजने संदर्भातील कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपास पाठिंबा जाहीर

दोघांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले पाठिंबा जाहीर केल्याचे लेखी पत्र

माढा (बारामती झटका)

सध्या संपूर्ण राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी आणि प्राथमिक व माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी शासनाने सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता 14 मार्चपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या संपाला वाढता प्रतिसाद मिळत असतानाच माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे व करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे या दोघा शिंदे बंधूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या लेखी पत्राद्वारे कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. या दोघांची पत्रे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून कर्मचाऱ्यांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

शासनाने नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता संघटनेच्यावतीने शासनाला निवेदन देणे, काळ्या फिती लावून काम करणे, एक दिवस सामूहिक रजा आंदोलन करणे, सामूहिक मोर्चा काढणे आदी प्रकारच्या लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने शासनाकडे रितसर मागणी केली. परंतु, आजतागायत शासनाने यावर कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. याच्या निषेधार्थ राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने हा बेमुदत बंद पुकारलेला आहे, असे दोघांनीही आपापल्या पत्रात नमूद केले आहे.

शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही अत्यावश्यक व जिव्हाळ्याची मागणी आहे. त्यामुळे विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या 14 मार्च पासूनच्या बेमुदत बंदला अनुक्रमे माढा व करमाळा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून मतदारसंघाच्या वतीने पाठिंबा जाहीर करीत आहोत, असेही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या स्वतंत्र पत्रात म्हटले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोहिते पाटील आणि शिंदे माढा विधानसभेच्या निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता ?
Next articleमांडवे येथील रत्नत्रय शैक्षणिक संकुलात जीवन सहारा परिवाराच्यावतीने चित्रकला व रांगोळी स्पर्धा संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here