आर्थिक साक्षरतेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

बारामती (बारामती झटका ) 

आर्थिक साक्षरतेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. जिल्हा परिषद पुणे, जिल्हा अग्रणी बँक, नाबार्ड, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  बारामती येथील विद्या प्रतिष्ठानात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी आयुष प्रसाद, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँक पुणेच्या उपाध्यक्ष अर्चना घारे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शालिनी कडू आदी उपस्थित होते. 

          श्री. पवार म्हणाले, आज सर्वांना आर्थिक साक्षरतेची गरज आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण भागातील महिला, युवक, शेतकरी यांना बचतीचे महत्व, बँक सुरक्षा, विमा योजना, पीक कर्ज सुविधा याबाबत माहिती मिळेल. ग्रामीण भागात बँक व ग्रामीण भागातील नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधला जावा याकरीता ही मोहिम राबवली जात आहे.  हा एक चांगला उपक्रम असून तो यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे. आर्थिक साक्षरतेमुळे निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. या मोहिमेतून गरीब व वंचीत घटकांना लाभ मिळेल आणि ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व्यवहाराविषयी माहिती होण्यास मदत होईल. आजच्या युगात प्रत्येकाने आर्थिक व्यवहारासंदर्भात जागरूक राहणे गरजेचे असल्याने ही मोहीम उपयुक्त ठरेल. मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समुहाला बचतीचे महत्व कळेल आणि आर्थिक साक्षरता मोहिमेमूळे मुद्रा योजनेसारख्या योजनांचा लाभ घेणेदेखील सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

          खासदार सुळे (ऑनलाईन) म्हणाल्या, एक आगळा वेगळा उपक्रम पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत असून सामान्य नागरिकांच्या आर्थिक साक्षरतेसाठी तो सफल होणे गरजेचे आहे. कार्यक्रम राबविताना चांगली माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि कार्यक्रमाच्या गुणवत्तेला महत्व द्यावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या योजनेची माहिती दिली. आर्थिक साक्षरता मोहिम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, बचत गटांच्या महिला, लघू उद्योजक यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे अधिकारी, महिला बचत गट सर्वानी व्यवस्थित काम करावे आणि हा उपक्रम सफल करुन दाखवावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य सर्व स्वयंसहाय्यता समुहांचे सदस्य, गावातील दुकानदार, मुद्राकर्ज घेणेसाठी इच्छूक नागरिक आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आर्थिक साक्षरता अभियानाचे फायदे

·        बँक सेवा सुविधा पासून वंचित असणाऱ्या ग्रामीण गरिबांचे आर्थिक समावेशन होईल.

·        स्वयंसहाय्यता समूह सदस्यांना बचतीचे महत्व पटेल.

·        सर्व ग्रामीण गरीब सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये सहभागी होतील.

·        बचत गटांना  आर्थिक  साक्षरतेचे प्रशिक्षण मिळाल्यामुळे ते त्यांचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल.

·         लहान दुकानदार मुद्रा योजनेमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यवसायामध्ये वाढ करतील.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहसूल व वन विभाग डिजीटल स्वाक्षरीत गाव नमुना सातबारा मोफत घरपोच वाटप योजनेचा रेडा गावांमध्ये शुभारंभ
Next articleबारामती येथे बांधकाम कामगार मोफत लसीकरण मोहिमेचा उपमुखमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here