आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा माळशिरस येथे रास्ता रोको.

पुरोगामी महाराष्ट्रात प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांना स्वतःच्या शेत जमिनीचा मोबदला मिळवण्याकरता आंदोलन करण्याची दुर्देवी वेळ…

माळशिरस ( बारामती झटका )

आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या भूसंपादन निवाड्यात झालेल्या गंभीर चुकांच्या निषेधार्थ सोमवार दि. ०४/१०/२०२१ रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी म्हसवड चौकामध्ये माळशिरसमधील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा रास्ता रोको करण्यासाठी ॲड. सोमनाथ दामोदर वाघमोडे, ॲड. प्रभाकर एकनाथ कुलकर्णी, अमोल ज्ञानेश्वर यादव, नितीन आप्पाजी वाघमोडे, सागर सुधीर ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाधीत सर्व शेतकऱ्यांची बैठक होऊन रास्ता रोको आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमिनीचा मोबदला मिळवण्याकरता आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ आलेली असल्याने सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हाधिकारी यांना प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्मायात आले आहे कि, माळशिरस नगरपंचायतमधील सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी माळशिरसमधून सदरचा महामार्ग हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आहे. म्हणून सदर प्रकल्पास जमिनी देण्यास माळशिरसमधील शेतकऱ्यांनी कोणताही विरोध केला नाही. परंतु माळशिरस मधील भूसंपादन निवाडामध्ये शासकीय अधिकार्‍यांकडून झालेल्या गंभीर चुकांमुळे व भूसंपादन अधिनियम २०१३ याचे संपूर्ण उल्लंघन करून चुकीचा निवाडा मंजूर केला आहे. तो माळशिरसमधील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मान्य नाही. त्याच्या विरोधात सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी आरबीट्रेशन (लवादामध्ये) गेले आहेत. त्यातील अपिले निकालावर आहेत परंतु, आजतागायत निकाल दिला गेला नाही. याउलट माळशिरसमधील शेतकऱ्यांच्यानंतर दाखल केलेली पंढरपूर तालुक्यातील याच महामार्गाबाबत लवादामध्ये गेलेल्या प्रकरणाचा निकाल तातडीने दिला गेला आहे. असे असताना सुद्धा गेली तीन वर्ष माळशिरसमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी विविध प्रकारची आंदोलने करून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत व शासन दरबारी याचा पाठपुरावा करीत आहेत. तरी अद्यापपर्यंत माळशिरसमधील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. उलट प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न देता व माळशिरस नगरपंचायत हद्दीमधील 80 टक्के भूसंपादन झालेले नसतानासुद्धा कायद्याचा गैरवापर करून प्रशासन रस्त्याचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे नियोजन करीत आहे, असे दिसून येत आहे. त्या निषेधार्थ सोमवार दि. ०४/१०/२०२१ रोजी सकाळी १० वा. माळशिरस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी म्हसवड चौक येथे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी सहकुटुंब सहपरिवार रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत माळशिरसमधील शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे न्याय पूर्वक मोबदला दिला जात नाही तोपर्यंत, प्रकल्पास जमीन देणार नाही व आमच्या जमिनीवर अतिक्रमण करू देणार नाही अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनाच्या प्रती केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीनजी गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माळशिरस विधानसभा आमदार रामभाऊ सातपुते, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, नॅशनल हायवे मुंबईचे रिजनल मॅनेजर सिंग साहेब, पंढरपूरचे घोडके साहेब, माळशिरस विभागाचे भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार माळशिरस, माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर आदींना निवेदनाच्या प्रती देण्यात आलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अभिवादन
Next articleडिजिटल सातबारामुळे अचूकता येईल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here