… अन्यथा संपावर जाणार
माळशिरस (बारामती झटका)
लालबावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन यांच्यावतीने तहसील कार्यालयात आशा व गटप्रवर्तक यांच्या थकित मोबदला व प्रलंबित प्रश्नांसंदर्भातचे निवेदन देण्यात आले आहे. यासह त्यांनी अनेक मागण्या या निवेदनामध्ये मांडल्या आहेत.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र आशा प्रवर्तक संयुक्त कृती समितीने केलेल्या आवाहनानुसार लालबावटा आशा गटप्रवर्तक युनियनच्या वतीने आज दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात येत आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या काळात आशा व गटप्रवर्तक आपला जीव धोक्यात घालून अतिशय प्रामाणिकपणे आपली कामे करत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून कोरोना संदर्भातील सर्वेक्षण, जनजागृती, लसीकरणच्या कामांमुळे त्यांना नियमित कामे करण्यास पुरेसा वेळ मिळत नसल्याकारणाने त्यांचे नियमित काम कमी झाल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ या चार महिन्यांचा नियमित कामांचा मोबदला, कोरोना सर्व्हेक्षण मोबदला, जुलै २०२० चा राज्याचा २०००/३००० रू. वाढीव मोबदला, जुलै २०२१ चा राज्याचा १५००/१७०० रु. वाढीव मोबदला मागील चार महिन्यांपासून मिळालेला नाही. फेब्रुवारी २०२१ पासून सर्वत्र कोव्हीड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आशा व गटप्रवर्तक यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. या लसीकरण मोहिमेत काम करणाऱ्या सर्वांना केंद्र शासनाकडून मोबदला जाहीर केलेला असताना आशा व गटप्रवर्तकांकडून मात्र दबाव टाकून विनामोबदला काम करून घेतले जात आहे. तरी त्यांनी लसीकरण मोहिमेत केलेल्या कामाचा सर्व थकित मोबदला त्वरित मिळावा.

सबब मागील चार महिन्यांपासून आशा व गटप्रवर्तक यांनी केलेल्या कोणत्याच कामाचा मोबदला त्यांना मिळाला नसल्याने आशा व गटप्रवर्तकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आपल्या स्तरावरून आशा व गटप्रवर्तक यांना दरमहा वेळेवर त्यांचा कामाचा मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करावा व राज्य पातळीवर शिफारस करून मागील चार महिन्यांपासून थकित असलेला मोबदला त्वरित मिळवून द्यावा, अशी विनंती देखील या निवेदनात करण्यात आलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng