माजी जिल्हा परिषद सदस्य ज्येष्ठ नेते स्व. कुंडलिकभाऊ रेडे पाटील गट सर्व जाती धर्मातील लोकांसमवेत निवडणुकीच्या तयारीत.

महाळुंग ( बारामती झटका )
माढा विधानसभा मतदार संघात माळशिरस तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. त्यापैकी पूर्व भागातील सर्वात मोठी प्रतिष्ठित असलेल्या महाळुंग ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झालेले आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालीला वेग आलेला आहे. माढा लोकसभा मतदार संघाचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाळुंग नगरपंचायत निवडणुकीत सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महाळुंगचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते स्वर्गीय कुंडलिक भाऊ रेडे पाटील यांचा असणारा राजकीय गट गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना समवेत घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागलेला असल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे.
माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कुंडलिकभाऊ रेडे पाटील यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा निर्माण केलेला होता. भाऊंनी प्रतिकूल परिस्थितीत महाळुंग गावच्या सरपंच पदाची धुरा संभाळली होती. गावाचा सर्वांगीण विकास हाच भाऊंचा ध्यास होता. त्यांनी सरपंच पदाच्या कालावधीमध्ये अनेक सार्वजनिक योजना, रस्ते, वीज, पाणीपुरवठा अशा योजना यशस्वीपणे राबविल्या होत्या. व्यक्तिगत लोकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन सोडविल्या जात होत्या. दिवसेंदिवस भाऊंची लोकप्रियता कार्यामधून वाढत गेली. महाळुंग पंचक्रोशीतील जनतेने भाऊंना भरघोस मताधिक्क्याने जिल्हा परिषद सदस्य पदावर काम करण्याची संधी दिलेली होती. जिल्हा परिषदेच्या कार्यकालामध्ये महाळुंग पंचक्रोशीमध्ये विधायक कार्य करून जिल्हा परिषद सदस्य कसा असावा याचे आदर्श उदाहरण भाऊंनी निर्माण केले होते. महाळुंग पंचक्रोशीमध्ये भाऊंच्या विचाराचे अनेक शिलेदार तयार झालेले होते. महाळुंग ग्रामपंचायतमध्ये भाऊंची अनेक वेळा सत्ता होती. ग्रामपंचायतमध्ये अनेक लोकांना भाऊंनी सरपंच, उपसरपंच, सदस्य या पदांवर काम करण्याची संधी निर्माण केलेली होती.
भाऊंचे अकाली दुःखद निधन झाल्यानंतर यांचे चिरंजीव राहुल आप्पा रेडे पाटील यांच्यावर त्यांच्या गटातील सर्व नेते व युवा कार्यकर्त्यांनी विश्वास टाकून गटाचे नेतृत्व दिलेले आहे. आप्पा यांनीसुद्धा भाऊंच्या पश्चात सर्वांना एकत्र घेऊन काम करण्यास सुरुवात केलेली आहे. कमी वयामध्ये जबाबदारी पडलेली असल्याने राहुलअप्पा सुद्धा सर्व जुनेजाणते लोकांशी सुसंवाद साधून युवकांना बरोबर घेऊन काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्यावर सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली आहे. ते पक्षीय जबाबदारी सुद्धा यशस्वीरित्या सांभाळत आहेत. त्यांना माढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे व सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य युवा नेते रणजीतभैय्या शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. गावांमधील अनेक अडचणी सोडविण्यासाठी शिंदे पिता-पुत्रांची साथ मिळत आहे. कुंडलिक भाऊंच्या पश्चात महाळुंगकर जनतेची इच्छा आहे, नगरपंचायत निवडणुकीत राहुल आप्पांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. भाऊंच्या स्मरणार्थ गटाकडे नगरपंचायतची सत्ता येण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोक कामाला लागलेले असल्याचे चित्र दिसत असल्याने निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राजकीय वातावरण तापलेले पहावयास मिळत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng