बारामती (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते बारामती तालुक्यातील घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटी आणि त्रिंबक विविध कार्यकारी सोसायटीच्या नवीन इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समिती सभापती नीता फरांदे, घाडगेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन सतीश चव्हाण, त्रिंबक सोसायटीचे संस्थापक चेअरमन बाबुराव चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि भारताचे आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करून बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना ते म्हणाले कि, घाडगेवाडी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पतसंस्था अ वर्गामध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत. विकास सोसायट्या ह्या ग्रामीण भागाच्या आर्थिक नाडया आहेत. शेतकऱ्यांना या सोसायट्यांचा फायदा होऊन ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता आली पाहीजे. त्रिंबक विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पारदर्शक आणि लोकाभिमूख काम करुन संस्थेची प्रगती करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोरोनाबाबत बोलताना श्री. पवार म्हणाले की, सर्व नागरिकांनी दोन्ही लसीचे डोस घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग अजून गेलेला नाही. सर्वांनी मास्क वापरणे, कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. चिन व रशियामध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. लस घेतल्याने अपाय होत नाही. लसीकरणाबाबत सर्व संस्थांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng