उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून ‘जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा’

महाराष्ट्राच्या घराघरातल्या माता-भगिनी-कन्यांना मान, सन्मान, सुरक्षितता देत आत्ननिर्भर करुया…

स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभेच्छा

मुंबई (बारामती झटका )

महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊं माँसाहेबांच्या राष्ट्रवादाचा, महाराणी ताराराणींच्या शौर्याचा, क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या सत्यशोधक विचारांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीचा गौरवशाली वारसा पुढं नेण्याचं काम राज्यातल्या माता, भगिनी, कन्यांनी समर्थपणे केलं आहे. शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्रकन्या आज आपलं कर्तृत्वं सिद्ध करत आहेत. महाराष्ट्राच्या घराघरातल्या या महाराष्ट्रकन्यांना मान, सन्मान, सुरक्षित वातावरण देत आत्मनिर्भर करुया. स्त्री-पुरुष समानतेतून उद्याचं शाश्वत भविष्य घडवूया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील स्त्रीशक्तीचा गौरव करुन राज्यातील जनतेला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील माता-भगिनींना, स्त्रीशक्तीला वंदन केलं असून समाजनिर्मितीतील त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी महाराष्ट्रानं सुरुवातीपासूनंच स्त्रीशक्तीचं महत्वं ओळखून त्यांना संधी देण्याचं काम केलं. राज्यातील स्त्रीशक्तीनंही संधींचं सोनं करत बलशाली महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलं. राजमाता जिजाऊं माँसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून रयतेचं राज्य, स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी महिलांची पहिली शाळा सुरु करुन महिलांना स्त्रीशिक्षणाची दारं खुली करुन दिली. महाराणी ताराबाईंनी आपल्या शौर्यानं इतिहास घडवला, त्या इतिहासानं अनेकांना प्रेरणा दिली.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले की, अलिकडच्या काळात भारतरत्न लतादीदी त्यांच्या स्वरसामर्थ्यामुळे स्वरसम्राज्ञी ठरल्या. लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी भारतीय लष्कराचं नेतृत्वं केलं. तत्कालिन संरक्षणमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी महिलांसाठी सैन्यदलांची दारं खुली केल्यानं आज अनेक महिला देशाच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्रानंही वेळोवेळी महिला धोरण लागू करुन राज्यातील महिला शक्तीला विकासाची संधी दिली. नोकरीत, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण दिल्यानं अनेक माता-भगिनी राजकारण, समाजकारणात आता सक्रीय झाल्या आहेत. उद्योग जगतात जबाबदारीच्या पदावर काम करत आहेत. निर्णयप्रक्रियेत त्यांचं योगदान महत्वाचं ठरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दौऱ्यात माझ्या शासकीय गाडीचं सारथ्यं स्थानिक पोलिस दलातील तृप्तीताई मुळीक या पोलिस भगिनीनं केलं होतं. राज्याच्या घराघरातली, गावखेड्यातली स्त्रीशक्ती ही महाराष्ट्राची मोठी ताकद आहे. या स्त्रीशक्तीला अधिक सक्षम, समर्थ, स्वावलंबी करुन बलशाली महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleड्रोनचा शेतीसंबंधी सुनियोजीत वापर काळाची गरज – सतीश कचरे
Next articleसोमनाथ भोसले यांची आरपीआयच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड – बी. टी. शिवशरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here