माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या मागणीला अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांचा दुजोरा.
पुणे ( बारामती झटका )
नीरा प्रणाली अंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरण प्रकल्पात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक असून ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसी पाणी अधिक आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्यातून तसेच डाव्या कालव्यातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनाला जोडून अजून एक आर्वतन ३० जूनपर्यंत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
नीरा उजवा कालवा आणि नीरा डावा कालव्याची तसेच भामा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवे सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आ. राम सातपुते, आ. अशोक पवार, आ. भीमराव तापकीर, आ. चेतन तुपे, आ. समाधान आवताडे, आ. सुनील शेळके, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे आदी उपस्थित होते.
माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याला आरक्षणाप्रमाणे कोठा मिळाला पाहिजे असा आग्रह धरला. कालवा सल्लागार बैठकीमध्ये नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर तसेच माळशिरस तालुक्यातील लाभक्षेत्राला मंजूर आरक्षणाप्रमाणे पाणी दिले जाईल. तसेच पाऊस सुरु व्हायला उशीर झाल्यास ३० जूननंतरही पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिली.
चासकमान प्रकल्पातूनही सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पवना प्रकल्पातही गतवर्षीप्रमाणे समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असल्याने पिंपरी- चिंचवड शहराला पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे, अशी माहिती यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या बैठकीस नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, खडकवासला पाटबंधारे विभागाचे विजय पाटील, नीरा डावा कालव्याचे श्री. बोडके, चासकमान प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. गुंजाळ आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng