अकलूज (बारामती झटका)
अकलूज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या आदेशानुसार पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सूर्यवंशी, पोलीस नाईक अनिल शिंदे पोलीस नाईक खाडे यांनी अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील श्रीपुर हद्दीत अवैध दारू विकणार्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील श्रीपुर हद्दीत पेट्रोलिंग करीत असल्याची माहिती त्यांना गुप्तदारांकडून मिळाली होती. मौजे बोरगाव येथील कमलाकर सूर्यकांत जवाहिरे रा. बोरगाव यांचे बोरगाव ते श्रीपुर रोड लगत शेतीचे मटेरियल ठेवण्याचे गोडाऊन आहे. त्या गोडाउनमध्ये देशी विदेशी दारू व बियर विकत असल्याचे खात्रीशीर बातमी त्यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच रस्त्यावरून जाणाऱ्या दोन इसमांना पंच म्हणून बोलावून घेऊन त्यांना बातमीतील हकिकत समजावून सांगून त्यांना पंच म्हणून तयार केले. त्यानंतर सर्व पोलीस स्टाफ व पंच असे खाजगी वाहनाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता तिथे एक व्यक्ती समोर टेबलवर देशी-विदेशी दारू व बियर ठेवून बसलेला दिसला. पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी त्याला जागेवरच पकडले. त्या व्यक्तीचे नाव पोपट उद्धव सुतार वय ५१ वर्षे, रा. बोरगाव असे आहे. त्यानंतर पंचांसमक्ष गोडाऊन तपासून पाहिल्यानंतर त्यांना देशी विदेशी दारू तसेच बियर असे ७९३ बाटल्या एकूण ४८,६१२ रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने पोलीस नाईक अनिल शिंदे यांनी हा माल जप्त केला.
सदर सीलबंद बाटली सी.ए. सॅम्पल करिता काढून घेऊन पोलीस व पंच यांच्या साह्याने कागदी लेबल लावले आहेत. पोपट सुतार यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर असे समजले की, मालक कमलाकर सुर्यकांत जवाहिरे रा. बोरगाव त्यांनी विक्री करिता हा माल दिला असल्याचे त्याने सांगितले. पुढील कारवाई पोपट सुतार यांच्यावर करण्यात आली आहे. कमलाकर जवाहिरे यांचे बोरगाव ते श्रीपुर रोड लगत असणाऱ्या शेती मटेरियल ठेवण्याच्या गाळ्यामध्ये त्यांच्या सांगण्यावरून पोपट सुतार हा बेकायदा, बिगर परमिट देशी विदेशी दारू असे एकूण ४८,६१२ रू. माल या परिस्थितीत मिळून आला आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिजन का. कलम ६५ (इ) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng