अकलूज येथील डॉ. श्रद्धा जवंजाळ ‘दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कारा’ ने दुबई येथे सन्मानित
अकलूज ( बारामती झटका)
अकलूज येथील डॉ. श्रद्धा राहुल जवंजाळ यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड्स (आंतरराष्ट्रीय ब्युटी आयकॉनिक) देऊन दुबई येथे दि. १५ मार्च २०२३ रोजी दुबई येथील उद्योगपती डॉ. अब्दुल्ला यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उदयपूरचे खा लाला जिना, प्रल्हाद मोदी, केंद्रीय मंत्री विश्वेश्वर, परराष्ट्रमंत्री राजकुमार राजनसिंग, भाजपचे माजी अध्यक्ष श्याम जाजू आदी उपस्थित होते.
फिल्म ऑर्गनायझेशन यांच्यावतीने देण्यात येणारा चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड आंतरराष्ट्रीय ब्युटी आयकॉनिक हा पुरस्कार असून दरवर्षी हा पुरस्कार सामाजिक व कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना देण्यात येतो. यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील हे पुरस्कार अभिनेता नील नितीन मुकेश, अनु मलिक, अंकिता लोखंडे, हिमाणी शिवपुरी, श्वेता तिवारी, बिग बॉस फेम अर्चना गौतम, प्रियंका चौधरी, गुलशन ग्रोवर, रजनीश दुगल, शेखर सुमन आदी मान्यवरांना देऊन गौरविण्यात आले आहे. डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी समाज उपयोगी कार्यक्रमाबरोबरच कला क्षेत्रातही आपला एक वेगळा ठसा उमटविला असून त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि कलेबाबत असलेली आवड लक्षात घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
डॉ. श्रद्धा जवंजाळ यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून यानिमित्ताने अकलूजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. माझे पती डॉ. राहुल जवंजाळ यांनी मला दिलेली साथ आणि सामाजिक क्षेत्रात केलेले काम याच माध्यमातून केलेली कलेची उपासना या प्रामाणिक कामाची पोहोच पावती मला या पुरस्काराने मिळाली असून यामुळे माझा आत्मविश्वास द्विगणित झाला आहे. यामुळे भविष्यातही आपण सामाजिक व कला क्षेत्रात भरीव काम करणार असल्याचे डॉ. श्रद्धा जवंजाळ यांनी सांगितले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng