ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार – मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे

आम्ही केवळ बोलून नाही तर करून दाखवतो, अजितदादांनी केले धनंजय मुंडेंचे कौतुक

कष्टकरी ऊसतोड कामगारांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करणार – अजितदादा पवार

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन

पुणे (बारामती झटका)

ऊसतोड कामगारांच्या जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिली. सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या दूरदृष्टी प्रणालीद्वारे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणाले की, ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासोबत संत भगवान बाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून वीस वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात येणार आहे. ऊसतोड कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. राज्याचा कुटुंब प्रमुख म्हणून महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. ऊसतोड कामगार ऊन, पाऊस, थंडी याचा विचार न करता मेहनत करतात. त्यांचे कुटुंब गावोगावी फिरत खूप मेहनत करतात आणि आपल्या आयुष्यात गोडवा आणतात. त्यांच्या प्रश्नांना नेमकेपणाने सोडवण्याचे काम महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे. ऊसतोड कामगारांच्या माता-भगीनींच्या आरोग्याचेही अनेक प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठी देखील विशेष लक्ष देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शासनाने गेल्या दोन दिवसात महत्वाच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करून कृतीतून राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे या क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन महामंडळाला त्यांचे नाव देण्यात आल्याचे सांगून स्व. मुंडे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंध यांचाही श्री. ठाकरे यांनी उल्लेख केला. ऊसतोड कामगारांची स्वतः संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने साथ दिल्याने महामंडळ अस्तित्वात आले. ऊस तोडणी करताना या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यातील १३ जिल्ह्यातून येणाऱ्या ९ ते १० लाख ऊसतोड कामगारांना आरोग्य, शिक्षण आदी सुविधा देताना त्याला ओळख मिळणे गरजेचे आहे. त्यांची पेन्शन तात्पुरती घरे, विमा सुविधा देण्याबाबतही विचार करावा लागेल. ऊस तोडणीसाठी आधुनिक साधनांच्या निर्मितीबाबतही विचार करावा. त्यांचे जीवन सुसह्य होईल आणि त्यांच्या मुलांना प्रगतीची संधी मिळेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ऊसतोड कामगारांची सावकारांकडून पिळवणूक केली जाते. या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. ऊसतोड कामगारांची पुढची पिढी चांगले जीवन जगू शकेल, असे प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून व्हावे. त्यांच्या मुला-मुलींना राज्यातील १० जिल्ह्यात ४१ ठिकाणी वसतिगृहे उभारण्यात येणार आहे. मोठ्या शहरात मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी टनामागे दहा रुपये याप्रमाणे साखर कारखान्यांकडून ११० कोटी आणि शासनाकडून ११० कोटी असे यावर्षी २२० कोटी उपलब्ध होतील. महामंडळाच्या कल्याणकारी योजनांसाठी शासन सर्व सहकार्य करेल. कामगारांची पिळवणूक कुठल्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असेही श्री. पवार म्हणाले. स्वतः ऊसतोड कामगारांच्या पोटी जन्म घेऊन त्यांनी केलेल्या कष्टाप्रति आत्मीयता बाळगून ऊसतोड कामगारांचे खऱ्या अर्थाने कल्याण साधावे यासाठी सत्तेत आल्याच्या पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे यांनी आग्रह धरला. आज त्यांच्या या प्रयत्नांना यश येताना पाहून त्यांच्या कामाचा अभिमान वाटत आहे. आम्ही केवळ बोलणारी नाही तर करून दाखवणारी लोक आहोत, अशा शब्दांत अजितदादांनी धनंजय मुंडे यांचे यावेळी कौतुक केले.

पुढे बोलताना श्री मुंडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ऊसतोड कामगारांच्या या महामंडळास अस्तित्वात आणण्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आता आम्हाला कायमस्वरूपी निधीची सोय देखील झाली आहे. पुण्यात ५०० मुलांसाठी आणि ५०० मुलींसाठी असे १००० क्षमतेचे उच्च शिक्षण घेणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी वसतिगृह मंजूर करून द्या, बाकी काही नको, अशी विनंती यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. यावेळी ऊसतोड कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. ऊसतोड कामगारांसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते ऊस तोड कामगार नोंदणी संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या बोधचिन्ह व ऊसतोड कामगारांच्या व्हिजन डॉक्युमेंटचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ऊसतोड कामगारांचा सत्कार करण्यात आला व त्यांना प्रातिनिधिक स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले‌. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नारनवरे यांना ऊसतोड महामंडळाचे नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी लघु चित्रफितीच्या माध्यमातून महामंडळाच्या निर्मितीचा प्रवास मांडण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार रोहितदादा पवार, नरेंद्र दराडे, आ. अतुल बेनके, आ. संजय दौंड, आ. सुनील टिंगरे, आ. सुनील शेळके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त प्रकाश देशमुख आदी उपस्थित होते. त्याचबरोबर माजी आमदार केशवराव आंधळे, दत्तात्रय धनकवडे, शितलताई सावंत, सुशीलाताई मोराळे, रेखाताई टिंगरे, रामकृष्ण बांगर, नंदकुमार मोराळे, श्रीमंत जायभाये, सारंग आंधळे, प्रदीप भांगे, दत्तोबा भांगे, गोरक्ष रसाळ, पंढरीनाथ थोरे, दादासाहेब मुंडे, विष्णुपंत जायभाये यांच्यासह विविध ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleऊस तोडणी केलेल्या पंडितआण्णांचा मुलगा मंत्रिमंडळात याचा अभिमान – अजितदादा पवार
Next articleमाळशिरसमधील अहिल्यादेवी चौक बनला मृत्यूचा सापळा, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here