मळोली (बारामती झटका )
मळोली ता. माळशिरस येथे बहुतांश शेती ही ऊसाची शेती म्हणून ओळखली जाते. गावातील सत्तर टक्के नागरिकांची प्रत्येक वर्षी ऊस लागवड असते. हुकमी पीक व हमखास उत्पन्न म्हणून ऊस पीक ओळखलं जातं. मात्र, यावर्षी प्रत्येक शेतकरी वर्गास आवडणारे ऊस पीक नको नको असे झाले असून कधी एकदाचा आपल्या शेतीमधून ऊस तुटून जातोय याची वाट आज शेतकरी पहात आहे. मळोली परिसरात लागवडीसाठी निवडला जाणारा हंगाम, आडसाली व पूर्व हंगाम असून अनेक शेतकरी तालुक्यातील वेगवेगळ्या कारखान्याचे सभासद आहेत. तालुक्यातील चार व बाजूच्या तालुक्यातील तीन कारखान्यांना ऊस न्या, ऊस न्या, अशी आर्त हाक देत असलेला या भागात शेतकरी दिसून येत आहे.
पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून लवकरात लवकर आपला ऊस कसा कारखान्यास जाईल, यासाठी प्रयत्न चालू आहेत. मळोली परिसरातील ऊस अकलूज, सदाशिवनगर, माढा, राजेवाडी, सांगोला, भाळवणी, चांदापुरी या भागातील कारखान्यात जातो. जवळपास सत्तर टक्के सभासद हे राजेवाडी व सहकार महर्षी या करखान्यास शेअर्स भागीदार असून करखान्यातील हार्वेस्टिंग विभागातील गलथान कारभारामुळे या भागातील शेतकरी सभासद असूनही ऊस तोडणीसाठी दारोदार फिरत आहेत. केवळ कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या नोंदी घेतल्याने व काही जणांच्या नोंदीच न घेतल्याने आज ही वेळ शतकरी वर्गावर आली आहे. सद्य स्थितीत जो ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे, तो पेटविल्याशिवाय तोडला जात नसून त्यामुळे एकरी वीस हजार रुपयांच्या आसपास भुर्दंड पडत असून या प्रकारास शेतकरी नाहक त्रासावला जात आहे. संबंधित कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यास या प्रकाराबद्दल विचारले असता कानावर हात ठेवून आपल्या ऊसाची व्यवस्था आपण स्वतः करावी, अश्या प्रकारचे बेजबाबदार उत्तर देऊन शेतकरी वर्गास त्रास देण्याचे काम चालू आहे.
ज्या सभासदांच्या तक्रारीवर मार्ग काढण्यासाठी संचालक मंडळ नेमले जात असते, ते या कालावधीत कुठेही दिसत नसून पडत्या काळात कारखान्याच्या उभारीसाठी गळा काढणारे आज कुठे गेलेत असा सवाल सामान्य सभासद विचारताना दिसत आहे. शासकीय सहकार आयुक्त यांनी सर्व ऊस गाळप केल्याशिवाय कारखाने बंद केले जाणार नाहीत, ही घोषणा शेतकरी वर्गास आधार देण्याचे काम करीत असून जर गाळपाविना जर एखाद्या शेतकऱ्यांचा ऊस राहिला तर त्यास जबाबदार कोण या आणि अश्या अनेक प्रश्नांनी मळोली परिसरातील शेतकरी वर्गाच्या मनात काहूर निर्माण झाले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng