इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आणि ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी वसुंधरेचे जतन आणि संरक्षण केले पाहिजे. केवळ झाडे लावून चालणार नाहीत तर ती जगली देखील पाहिजेत. यापूर्वीदेखील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने इंदापूर नगर परिषदेच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. भविष्यातही या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी वसुंधरेच्या संरक्षणार्थ आणि स्वच्छ व सुंदर हरित इंदापूरसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी केले आहे. मंगळवार दि.11 जानेवारी रोजी इंदापूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना वसुंधरेचे महत्त्व समजावून सांगून तिच्या संरक्षणाची शपथ देण्यात आली. इंदापूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा तसेच आय टी आय चे सूर्यकांत झणझणे, दत्तात्रय गावडे, संजय कुमठेकर, निवास काळे, अविनाश कुलकर्णी, विजयकुमार आतार, चंद्रकांत गलांडे यांसह शिक्षक, विद्यार्थी आणि नगरपरिषद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंदापूर नगर परिषदेने सलग चार वेळा देशपातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर 2022 सालातील माझी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये इंदापूर नगरपरिषद पूर्ण ताकतीने उतरल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून सध्या शहरात स्वच्छता पंधरवडा राबवण्यात येत आहे. विविध ठिकाणी स्वच्छतेवर भर दिला जातोय. याशिवाय इंदापूर शहर स्वच्छ व हरित करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान केंद्र सरकारकडून वय वर्ष 15 ते वय वर्ष 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना सध्या लसीकरण करण्यात येत असून औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांना लस दिली जात आहे. नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत याचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. याशिवाय शंकरराव पाटील चारिटेबल ट्रस्टमध्ये देखील इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. उपस्थितांना वसुंधरेची शपथ देखील देण्यात आली आहे. हे दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आले आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng