6 व्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ ; चालू हंगामात 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट
माढा (बारामती झटका राजेंद्र गुंड यांजकडून)
- चालू गळीत हंगामात कमलाभवानी रिफाईड शुगर करमाळा तालुक्यातील इतर साखर कारखान्यांच्या ऊस दराच्या तुलनेत जास्त दर देणार असून 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक-चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी केले.
ते पांडे ता.करमाळा येथे कमलाभवानी रिफाईड शुगरच्या 6 व्या गळीत हंगामाचा मोळी टाकून शुभारंभ करताना 24 ऑक्टोबर रोजी बोलत होते.
सुरुवातीला पहिल्या वाहनाचे पूजन माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांच्या हस्ते करुन मान्यवरांच्या उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकण्यात आली.

प्रास्ताविक करताना डायरेक्टर जनरल हरिदास डांगे म्हणाले की, कारखान्याने मागील गळीत हंगामातील एफआरपी ची रक्कम पूर्ण दिली आहे. सर्व कामगारांचे पगार वेळेवर दिले आहेत.कारखाना उभारणीत आमदार बबनराव शिंदे, आमदार संजयमामा शिंदे आणि माढेश्वरी अर्बन बँकेचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना विक्रमसिंह शिंदे म्हणाले की, मागील पाच हंगामातील दोन हंगाम दुष्काळी परिस्थितीमुळे वाया गेले. चालू हंगामात कारखान्याची गाळप क्षमता 5 हजार मेट्रिक टनावरुन 6 हजार मेट्रिक टन केली आहे त्यामुळे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप केले जाणार आहे.कामगारांना त्यांच्या अनुभवानुसार वेतन वाढ दिली जाणार असून सुरवातीपासून असलेल्या कामगारांना कायम करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील खाजगी साखर कारखान्यांनी वाहतूक दरवाढ दिल्यास आम्ही सुद्धा देणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त चांगला ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत म्हणाले की,भविष्यात या कारखान्याची नक्कीच भरभराट होऊन या भागाचा कायापालट होणार आहे.शिंदे कुटुंबियांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे.आमदार शिंदे बंधू हे नुसते राजकीय पुढारीच नाहीत तर त्यांच्याकडे व्यापारी दृष्टीकोन असल्याने त्यांच्या सर्व संस्था व कारखाने नावारूपाला आले आहेत. कोणतीही संस्था मोठी झाली तर कर्मचारी आपोआपच मोठे होतात त्यामुळे कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सूर्यकांत पाटील, सुजित बागल,करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी,पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
सुत्रसंचालन संजय साखरे यांनी केले. आभार शेतकी अधिकारी शांताराम जगदाळे यांनी केले.
यावेळी सरपंच विलास पाटील,विनय ननवरे,मानसिंग खंडागळे,माधवराव खाटमोडे,जनरल मॅनेजर जी.के. गिरमे, डॉ.राहुल कोळेकर,अशपाक जमादार,नामदेव बागल,राजेंद्र गुंड, शिवाजी नरोटे, तुकाराम क्षीरसागर, समाधान भोगे, तात्याराव सरडे, शहाजी झिंजाडे,बाळनाथ जगदाळे, महादेव फंड,गणेश सरडे, युवराज गपाट, सुरज ढेरे, विक्रम कुंभार, विशाल घोलप, दस्तगीर मुजावर,राजू पवार यांच्यासह कारखान्याचे सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng