सातारा (बारामती झटका)
’मानवी जीवनाची कृतार्थता ही आयुष्यभर जपलेल्या मुल्यांवर अवलंबून असते. स्वावलंबन, सत्य, सेवा, समर्पण आणि साधेपणा ही कर्मवीरांच्या जीवनाची पंचसूत्री होती. त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मुल्ये जपली. कर्मवीरांची लढाई ही मानव प्रतिष्ठेसाठी होती. मानवता धर्म सांगण्यासाठी, कर्मवीर यांच्यासारखी माणसे जन्मास येतात. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर अण्णांनी समाजपरिवर्तनाचे व प्रगतीचे पर्व उभे केले‘, असे विचार प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले. ते येथील छत्रपती शिवाजी कॉलेज व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३४ व्या जयंती समारंभात बोलत होते. छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, ऑडीटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य शहाजी डोंगरे व संस्थेतील अनेक मान्यवर या समारंभास उपस्थित होते.
कर्मवीरांच्या कार्याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, ’भारत देश जेव्हा इंग्रजाविरुद्ध लढत होता. त्यावेळी कर्मवीर आण्णा क्रांतिकारक यांना साथ देत अज्ञानाच्या अंधाराविरुद्ध लढत होते. लढणे हा त्यांचा पंड तर मानवता हा त्यांचा धर्म होता. ते दुःखाच्या मुलखातील प्रकाशयात्री होते. समाजाला बौद्धिक गुलामगिरीतून मुक्त व वैचारिकदृष्ट्या सशक्त करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. शारीरिक श्रम अविभाज्य मानून रयतेतून स्वावलंबी आणि स्वाभिमानी पिढी त्यांनी घडवली. आपल्या सत्यशोधकी विवेक दृष्टीला जो विचार पटला तो निर्भयपणे त्यांनी कृतीत आणला व मानवतेचे व्यापक दर्शन त्यांनी घडवले. संकल्प आणि साधना यांच्या एकरूपतेत त्यांचे मोठेपण असून ते गोरगरीब लेकरांचा उद्धार करणारे लोकसिद्ध ईश्वर होते’.
रयत शिक्षण संस्थेच्या वर्तमानाचा वेध घेताना ते पुढे म्हणाले की, ज्ञान, संशोधन, व्यवसायिक शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण यांची गरज निर्माण झाली असून या स्पर्धात्मक युगात रयत शिक्षण संस्थेने अध्यक्ष शरद पवार व डॉ. अनिल पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर होत आहे. त्यामुळे रयतेची शाळा, महाविद्यालये ही समाजाची उर्जापीठे झाली असल्याचे ते म्हणाले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे म्हणाले की, कर्मवीर आण्णांनी समता निर्माण करण्यासाठी आवर्जून प्रयोग केले. बहुजन समाजातील मुलाच्या प्रज्ञेला त्यांनी संधी निर्माण करून देत शिक्षणाला श्रमाची जोड दिली. समाजाच्या गरजा ओळखून योग्य परिवर्तन दिशा दाखवणारे ते दीपस्तंभ होते, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रास्ताविक डॉ. अनिलकुमार वावरे यांनी केले तर प्रोफेसर डॉ. सुनिता घार्गे यांनी आभार मानले तर प्रा.किशोर सुतार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील उपप्राचार्य प्राध्यापक, विद्यार्थी व सेवक उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng