लोणंद (बारामती झटका)
कर्मवीर भाऊराव पाटील हे खरे कर्मवीर, राष्ट्रवीर, आधुनिक शिक्षणाची कवाडे उघडणारे भगीरथ, क्रियाशील पंडीत, जनतेचे कर्मवीर, शिक्षणाचे मठ निर्माण करणारे शंकराचार्य, तत्वनिष्ठ सुधारक, बहुजन उद्धारक, इहवादी जागरूक नेते, स्पष्ट वक्ते प्रबोधनकार, जिद्द आणि धडाडीचे मूर्तिमंत प्रतिक, सेक्युलेरीझमचा पुरस्कार करणारे वास्तववादी दार्शनिक तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रयोग करणारे वैज्ञानिक, जोतीरावांच्या पाठीमागे चालून जोतीराव फुले यांच्या पुढे जाणारे निष्ठावंत वारकरी होते. कर्मवीरअण्णा यांचे कार्य खूप व्यापकआहे. कर्मवीर हे पुस्तकात न मावणारे व्यक्तिमत्व होते, असे विचार छत्रपती शिवाजी कॉलेज येथील मराठी विभाग प्रमुख डॉ. सुभाष वाघमारे यांनी व्यक्त केले. ते लोणंद येथील न्यू इंग्लिश स्कूल [मुलींचे] येथे आयोजित कर्मवीर जयंती कार्यक्रमात कर्मवीरांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगताना बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा नेवसे या होत्या. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मिलिंद हरिभाऊ माने हे ही उपस्थित होते.
कर्मवीरांच्या चरित्राचे अनेकांनी लेखन केले असले तरी, रा.ना. चव्हाण यांनी रयत शिक्षण पत्रिकेत व ग्रंथ लिहून जे आकलन व्यक्त केले आहे ते, वास्तवाच्या अधिक जवळ जाणारे आहे असे ते म्हणाले. रा.ना .चव्हाण यांनी कर्मवीरांच्या व्यक्तिमत्वाविषयी म्हटले आहे की, बुद्धाची करुणा, महावीरांची अहिंसा, ख्रिस्तांचे प्रेम, शिवरायांचा ध्यास, म. फुल्यांची बंडखोर वृत्ती, सावित्रीबाई यांचे समर्पण, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंद्यांची निरपेक्ष सेवावृत्ती, राजर्षी शाहूंचे प्रागतिक विचार, तर सयाजीराव महाराजांचे विद्याप्रेम हे त्यांच्यात दिसते.’ ही मते सर्वांनी नीट समजून घ्यावीत असे ते म्हणाले. कर्मवीरांच्या त्यागाबद्दल सांगताना ते म्हणाले, स्वतःची सगळी कमाई, पत्नीचे दागिने वसतिगृहातील मुलांसाठी त्यांनी दिले. संस्थेच्या मुठभर शेंगा घेणे हे देखील त्यांना योग्य वाटले नाही, अशी त्यांची अनासक्ती होती. शेकडो एकर जमीन संस्थेला मिळून देखील त्यातील कणभर जमीन त्यांनी आपल्यासाठी घेतली नाही. त्यांची राहणी साधी होती. ते एस.टी.ने प्रवास करीत आणि तालमीत मुक्काम करीत. सामान्य माणसात बसून ताक-कण्या खात. विद्यार्थी आणि पालकांची देखील ते काळजी घेत. आपल्या संस्थेचे संस्थान न करता ती संस्था त्यांनी विद्यार्थ्यांच्या हाती सोपवली. अनेक विद्यार्थी परदेशी पाठवले. आपल्या हयातीत आपले विद्यार्थी हे संस्थेसाठी आजीव सेवक झालेले त्यांनी पाहिले. त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील कर्मवीरांच्यानंतर भारताच्या आणि जगाच्या नकाशात संस्थेला नेले. रयतेचे अमाप प्रेम रयत शिक्षण संस्थेला मिळाले, त्या मागे कर्मवीरांचा त्याग होता. त्यांचे विद्यार्थी ज्ञानदूत बनून समाजाला चांगली दिशा देत राहिले. शिक्षणाला सामाजिक बांधिलकीची जोड देणारे, संस्कार देणारे, आत्मबळ, आत्मविश्वास देणारे, श्रमाधिष्ठित शिक्षण कर्मवीरांनी दिले. मानवता केंद्रित समाज उभा करण्याचे स्वप्न कर्मवीरांनी साकार करून दाखविले. हा वारसा पुढे नेण्याचे काम आपल्याला करायचे आहे असेही ते म्हणाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यपिका सौ. सुनंदा नेवसे यांनी केले तर आभार सौ. अनिता गायकवाड यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Good post on Karmveer Bhaurao Patil. I am glad to observe quote of R N Chavan .