कारुंडे गावच्या सरपंचपदी बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांची बिनविरोध निवड…

‘माझं भाग्य समजतो या गावात माझा जन्म झाला, आपल्या सर्वांमुळे गावचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला’ – मावळते सरपंच अमरशेठ जगताप.

गावातील जेष्ठ मंडळींच्या सहकार्यामुळे गावात विकास करता आला यापुढेही अशीच गावाची एकजूट व्हावी.

कारूंडे ( बारामती झटका )

कारूंडे ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीतील थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच अमरशेठ जगताप यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी सौ.बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

कारूंडे ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच निवडीच्या वेळी गावातील गट-तट विसरून सर्व नेते मंडळींची ग्रामदैवत श्रीनाथाच्या मंदिरामध्ये निवडणुकीसंदर्भात बैठक ठरली होती. सदरच्या बैठकीमध्ये पहिले सरपंच अमरशेठ जगताप यांना व दुसऱ्यांदा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांच्या परिवारातील सदस्य असे ठरले होते. थेट जनतेतील सरपंच अमरशेठ जगताप झालेले होते. त्यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर सौ. बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांना सरपंच करावयाचे ठरले होते. मात्र महा विकास आघाडी सरकारने थेट जनतेतील सरपंच रद्द केलेले असल्याने बायडाबाई पाटील यांना सरपंच होण्याकरता ग्रामपंचायत सदस्य होणे गरजेचे होते. त्यासाठी लाला लहु रानगट यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्या रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्यपदी बायडाबाई पाटील बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य झाल्या होत्या. कारूंडे ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस. टी. चव्हाण यांनी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांची बैठक सरपंच निवडीसाठी बोलवली. यावेळेस सुवर्णा अमोल कर्चे, बायडाबाई रघुनाथ रुपनवर, संगीता दिलीप शिंदे, संगीता भारत नामदास, प्रमिला संतोष गोसावी, सुरेखा सोमनाथ रुपनवर, सागर सदाशिव सूर्यवंशी, कैलास हनुमंत गायकवाड, महेश वामन मसुगडे आदी सदस्य उपस्थित होते. सरपंच पदासाठी सौ. बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांचा एकमेव अर्ज आलेला होता. निवडणूक निर्णय अधिकारी एस.टी. चव्हाण यांनी बिनविरोध सरपंच पदाची घोषणा केली. निवडणूक निर्णय अधिकारी यांना तलाठी रवीकिरण लोखंडे आणि ग्रामसेवक व्ही. एस. मोरे यांनी सहकार्य केले.

थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच अमरशेठ जगताप यांनी गावामध्ये बचत गट भवन बांधणी, मस्कर ओढा खोलीकरण, प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित केले, 14 वा वित्त आयोग व दलित वस्ती मधुन 75 लाखाची कामे केली. ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ अभियानामध्ये माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. या सर्वांमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल ज्ञानदेव पाटील यांचे सहकार्य लाभले होते. नाथाच्या मंदिरामध्ये एकमेकांना शब्द दिलेला होता, शब्द पूर्ण केल्यामुळे नाथाच्या मंदिरात वाजत गाजत दर्शनासाठी सर्वजण गेलेले होते.

बिनविरोध सरपंच पदी बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांची निवड झाल्यानंतर ग्रामदैवत नाथाचे दर्शन घेऊन उपस्थित सर्व सदस्य व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विजयराव रुपनवर, माजी सरपंच हनुमंतराव पाटील, ज्येष्ठ नेते विजयराव मस्कर, दादासो रानगट, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल ज्ञानदेव पाटील यांनी सर्वांचे आभार मानून भविष्यामध्ये गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असून सर्वांच्या सहकार्याने गावातील विकास कामे केली जातील असे सांगितले.
थेट जनतेतील लोकनियुक्त मावळते सरपंच अमरशेठ जगताप यांनी सांगितले कि, आज कारुंडे गावच्या नवनिर्वाचित सरपंचाच्या निवडीबाबत जी प्रक्रिया घडली त्यासंदर्भात आज आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. याच मंदिरात २०१७ मध्ये गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींनी एक चांगला निर्णय घेतला की, गाव एकत्र करूया. लहानपणापासून आम्ही बघत आलो आहोत की, गावात मागील १०-२० वर्षांपासून राजकारणामुळे गावाचं नुकसान होतं, वैयक्तिक वादात वाढ होते. यामुळे गाव विकासापासून वंचित राहते. यासाठी गावातील सर्वच त्यामध्ये हनुमंत पाटील, बबन पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष विजयराव रुपनवर, श्रीनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय बापू, रमेश बापू व गावातील अनेक प्रतिष्ठित आजपर्यंत गाव चालविणारे सर्व नेतेमंडळींनी एकमेकांना विश्वासात घेऊन २०१७ च्या निवडणुकीमध्ये मंदिरात एक निर्णय घेतला की, आपण सर्वजण एकत्र येऊन गाव बिनविरोध करूया. हा निर्णय घेणे तसं काही सोपं नव्हतं कारण, त्यांच्यामागे प्रत्येकाच्या मागचे कार्यकर्ते येतील की नाही ही शंका होती कारण विचार फाटले होते. मागील वीस वर्षापासून विस्कटलेले राजकारण जुळवून घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. तरी पण या सर्वांनी दोन्ही पार्टीनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर ते ठाम राहिले. त्यांना या गोष्टीचा फार त्रास झाला. यातील काही नेते मंडळींना नको त्या गोष्टी ऐकून घ्याव्या लागल्या‌. यातूनपण सर्वजण एकत्र आले. मी माझं भाग्य समजतो की, या गावात माझा जन्म झाला. या सर्वांमुळे मला या गावचा प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला. आणि पहिले अडीच वर्ष आम्हाला द्यायचे ठरले. आणि दुसरे अडीच वर्ष शालेय समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना द्यायचे ठरले. हा निर्णय झाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर इलेक्शन लागलं, इलेक्शन प्रक्रिया पूर्ण झाल्या आणि त्याच्यानंतर गावच्या विकासाच्या हिताचा निर्णय झाला. तो निकाल झाल्यानंतर भविष्यकाळात अडीच वर्षांनी राजीनामा द्यायचा असं ठरलं होतं. परंतु covid-19 सारख्या महामारीमुळे सर्वांची इच्छा असूनसुद्धा आणि गावात एक वेगळा पायंडा पाडायचा होता गावातील कुठलेही वचन तुटू नये. मागील काळात काही गैरसमज झाले होते. पण कोरोना महामारीमुळे राजीनामा देता येत नव्हता. संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला होता. त्यामुळे तो राजीनामा मंजूर झाला नाही. तरीपण अडीच वर्षांच्या काळानंतर पुढारी आणि नेते मंडळींच्या हातात मी माझा राजीनामा सोपविला. आणि मी सांगितलं मला यातून मुक्त करा. यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला की, येणारे १/२ वर्ष अडचणीचे आहेत. त्यामुळे तुम्ही सरपंच याच पदावर राहा. पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे की, या शपथेतून आणि या विधीतून जी काही वचने एकमेकांना दिली होती, त्यातून आम्ही दोन्ही पार्ट्या मोकळ्या झालेलो आहोत, यातून बाहेर निघालो आहोत. पुढील काळात मला अपेक्षित आहे की, गाव अशाच पद्धतीने एकत्र रहावे गावचा विकास अशाच पद्धतीने व्हावा. आज गावातील ज्येष्ठ मंडळींनी, ग्रामस्थांनी गाव चालवण्यात मला जे सहकार्य केलं त्यातून मला असं कधीच वाटलं नाही कि, मी गावचा सरपंच आहे. कारण सगळेच मला मदत करत होते. माझ्या व्यवसायामुळे मला कमी वेळ देता येत होता, तरीपण सर्वांनी मला मदत केली, त्याबद्दल मी सर्व गावचे आणि नेतेमंडळींचे हात जोडून आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढच्या काळात मला अपेक्षा आहे की, नवीन सरपंच बायडाबाई पाटील या अतिशय चांगलं काम करतील. यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण मिळून गाव एक करू. गाव एक राहिलं तरच गावचा विकास होईल. मागील काही वर्षांपासून आपण राजकारण बघत आलो आहोत. आज आपण सर्वजण एकत्र आनंदाने बसलो आहोत ही सर्वात मोठी गोष्ट आहे. हाच पायंडा जर आपण पुढे चालू ठेवला तर ही चांगली गोष्ट आहे. मी विनंती करतो की, आपण अशा चांगल्या विचारांनी एकत्र येऊया, असे मौलिक विचार मावळते सरपंच अमरशेठ जगताप यांनी ग्रामदैवत नाथाच्या मंदिरामध्ये सर्वांच्या उपस्थितीत व्यक्त करून आपल्या भावना मांडल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यात भाजपमध्ये मोहिते-पाटील गट जोमात जुना भाजप गट कोमात अशी अवस्था नगरपंचायत निवडणुकीत झाली.
Next articleमाळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांचा जानकर यांच्याकडून सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here