कुरबावी गावातील भुमिपुत्राचा कर्तुत्व, नेतृत्व आणि दातृत्व तिन्ही गुणांचा सुरेख संगम

माळशिरस तालुक्यात दक्षिण मारुती प्राणप्रतिष्ठा, श्रीराम, श्रीनाथ, श्री मारुती मंदिर कलशारोहन कार्यक्रम माजी आमदार रामहरी रुपनवर, आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत संपन्न

माळशिरस ( बारामती झटका )

कुरबावी ता. माळशिरस येथे दक्षिण मारुती मंदिरामध्ये श्री मारुती राया मूर्ती प्राणप्रतिष्ठा, श्रीराम, श्रीनाथ व श्री मारुती मंदिर कलशारोहन कार्यक्रम सोमवार दि. 1/11/2021 रोजी उद्योजक दत्तात्रय विठ्ठल शेळके व माळशिरस पंचायत समितीच्या सदस्या सौ. संगीता दत्तात्रय शेळके यांच्या शुभहस्ते येथे संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थित दीपावलीच्या शुभमुहूर्तावर वसुबारस या दिवशी संपन्न झाला‌.

कुरबावी गावातील उद्योजक दत्तात्रय शेळके भूमिपुत्राचे कर्तुत्व, नेतृत्व आणि दातृत्व या तिन्ही गुणांचा सुरेख संगम पहावयास मिळालेला आहे.
कुरबावी तालुका माळशिरस हे गाव नीरा नदीच्या काठावर पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर नैसर्गिक वारसा लाभलेले हे गाव वसले आहे.

सदरच्या गावामध्ये समस्त ग्रामस्थ यांनी श्रीराम, श्रीनाथ, श्री मारुती अशा तीन देवांची मंदिरे बांधण्याची संकल्पना समोर आणली. त्यावेळेस कुरबावी गावामध्ये सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतलेले दत्तात्रय शेळके यांनी पाया पूजनाच्या वेळेसच भरीव निधी देऊन समस्त गावकरी यांना प्रोत्साहित केले. गावातील अनेक दानशूर लोकांनी लोकवर्गणीमधून पैसे जमा करून मंदिराची उभारणी सुरू झाली. गावांमधील व आसपासच्या गावातील दानशूर लोकांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनवर, यांनी आमदार फंडातून श्रीनाथ मंदिरासमोर सभा मंडप बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. महाराष्ट्राचे माजी दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे सरसेनापती महादेवराव जानकर यांनी श्री मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला. दोन्ही आमदारांच्या आमदार फंडातून सुसज्ज सभामंडप एकत्र करून मंदिरासमोर भव्य सभामंडप गावकऱ्यांच्या संकल्पनेतून कॉन्ट्रॅक्टर मधुकर चव्हाण यांनी दर्जेदार व आकर्षक सभामंडपाची उभारणी केली. दिवसेंदिवस तिन्ही मंदिराचे बांधकाम जलद गतीने सुरू झाले. बघता बघता मंदिराचे शिखर तयार झाले. कुरबावी ग्रामस्थांनी अनोखी संकल्पना राबवलेली आहे. एकाच ठिकाणी श्रीनाथ देवाची मूर्ती, राम सीता आणि लक्ष्मण यांची मूर्ती, आणि रामभक्त संकट मोचन हनुमान अशा तीन देवांचे एकाच ठिकाणी मंदिरे असणारे एकमेव कुरबावी गाव असावे.

दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर वसुबारस या दिवशी उद्योजक दत्तात्रय विठोबा शेळके व पंचायत समिती सदस्या सौ. संगीता दत्तात्रय शेळके या उभयतांच्या शुभहस्ते होम हवन करून मारुतीरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तिन्ही देवांचे स्वतंत्र मंदिरावरून शिखरं तयार केलेली होती. शिखरावरील कलशारोहण कार्यक्रम कुरबावी पंचक्रोशीतील ग्रामस्थ भाविक भक्तांच्या उपस्थित संपन्न करण्यात आला. प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन कार्यक्रमानिमित्त उद्योजक दत्तात्रय शेळके यांनी कुरबावी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक भक्तांना घरामध्ये चुल न पेटविता चुलबंद जेवणाचे आमंत्रण दिलेले होते. 10 हजार लोकांना कळी, भात ,भाजी, पुरेल एवढे अन्न तयार केलेले होते. पाण्याची सुविधा उपलब्ध केलेली होती.

दुपारी तीन वाजता मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन कार्यक्रम विधीवत संपन्न झाला. कुरबावी गावातील व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त उपस्थित होते. सर्वांनी मनोभावे तिन्ही मंदिरांमध्ये देवांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. पंचायत समिती सदस्या सौ. संगीता दत्तात्रय शेळके महिलांच्या पंगतीमध्ये आग्रहाने महाप्रसादाचे वाटप करीत होत्या. दत्तात्रय शेळके आलेल्या लोकांचे नम्रपणे स्वागत करून महाप्रसादासाठी आग्रह करीत होते. पंचक्रोशीतील महिला लहान मुले पुरुष अशा सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

उद्योजक दत्तात्रय शेळके यांची जन्मभूमी कुरबावी आहे‌ पूर्वीच्या काळी गरीब परिस्थितीत उदर निर्वाह करत असत. दत्तात्रय शेळके यांनी शेती महामंडळाच्या कामावर जाण्याकरता गुरसाळे या गावी वास्तव्य केलेले होते‌ त्यामुळे दत्तात्रय शेळके यांची जन्मभूमी कुरबावी तर कर्मभूमी गुरसाळे आहे. दत्तात्रय शेळके यांनी प्रतिकूल परिस्थितीत गरिबीची जाण ठेवून आई-वडिलांच्या आशीर्वादाने उच्च शिक्षण घेऊन नोकरीला प्राधान्य न देता उद्योग व्यवसाय सुरू केला. प्रामाणिकपणा स्वच्छ विचार सरणी आणि गरिबीची जाण यामधून उद्योग व्यवसायामध्ये गरुड भरारी घेतली. दत्तात्रय शेळके यांनी ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरी भागात जाऊन आपला उद्योग व्यवसाय फुलवला, वाढवला. त्यामधून त्यांनी आपली आर्थिक प्रगती केली. आर्थिक संपत्ती सुबत्ता आली तरी, त्यांनी आपल्या भागातील नाते कमी केलेले नाही. समाजामध्ये आपण पाहतो अनेक माणसे पूर्वीचा काळ विसरतात मात्र, दत्तात्रय शेळके यांनी नेहमी पाठीमागे पाहिलेले आहे. गावातील लोकांनी पंचायत समितीसाठी त्यांच्या धर्मपत्नी सौ. संगीता शेळके यांना उभे करून भरघोस मतांनी विजयी केले होते. संगीता शेळके यांच्या राजकारणामध्ये हस्तक्षेप न करता काही मिळावं यासाठी राजकारण न करता अनेक वेळा स्वखर्चातून मतदार संघामध्ये लोक उपयोगी कामे केलेली आहेत. मंदिराच्या पायाभरणीपासून कलशारोहन होईपर्यंत जिथे आर्थिक अडचण येईल तिथे दत्त म्हणून दत्तात्रय शेळके हजर राहिलेले आहेत. त्यामुळे कुरबावी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्यावतीने उद्योजक दत्तात्रय शेळके व पंचायत समिती सदस्या सौ. संगीता शेळके यांचा मंदिरामध्ये सर्व भाविक भक्तांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.

कुरबावी पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविक भक्तांनी कुरबावी गावच्या भूमिपुत्राचे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व तिन्ही गुणांचा सुरेख संगम पहावयास मिळालेला असल्याने कलशारोहन व मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआमदार रोहितदादा पवार यांच्या उपस्थितीत माळशिरसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा.
Next articleमाळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीच्या दोन गटाची ऐन दिवाळीत दुफळीचे दर्शन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here