कोरोनामुळे २०० वर मैदाने रद्द, स्पर्धा होण्याची मागणी, मल्लांना आर्थिक मदतीची गरज
सांगली (बारामती झटका)
सांगली जिल्हा नाट्यपंढरी, शाहीर पंढरी तसेच ती क्रीडानगरी म्हणूनही ओळखली जाते. राज्यात जास्त मैदाने घेणारी कुस्ती शौकिनांची सांगली सध्या कोरोनामुळे गेले दीड वर्षे थांबून आहे. कोरोना या महामारीमुळे कुस्ती मैदानांचे सलग दोन सिझन वाया गेले असून अनेक नामांकित मल्लानांचा खुराक, व्यायाम बंद झाला होता. नुकत्याच तालमी सुरु झाल्या असून, मल्ल व कुस्ती शौकिनांना कुस्ती स्पर्धा-मैदानांची ओढ लागली आहे. सध्या सर्व व्यवसाय उदीम हळूहळू सुरु होत असून, मात्र यात्रा-जत्रा बंदच आहेत. त्यामुळे कुस्ती शौकीनांकडून कुस्ती मैदाने व्हावीत, अशी मागणी होत आहे.
क्रीडापंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात कुस्तीचीही मोठी परंपरा आहे. मातीचा नाद करणारे या जिल्ह्यात अनेक नामांकित पैलवान झाले. यामध्ये हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी आप्पा कदम, महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारी, महाराष्ट्र केसरी भगवान मोरे, वज्रदेही हरी नाना पवार, भारतभीम ज्योतिरामदादा सावर्डेकर, मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर, बसलिंग करजगी, नाथा पवार, बिजलीमल्ल संभाजी पवार, संभाजी सावर्डेकर, नारायण पवार आदींनी सांगलीचे नाव देशासह जगभर पोहोचविले. छोटी-मोठी अशी विक्रमी मैदाने घेण्यात हा जिल्हा राज्यात पुढे आहे. पण सध्या कोरोनामुळे गेले दोन वर्ष अखंड सिझन वाया गेला असून सुमारे ५०० हून अधिक पैलवानांचा व्यायाम व खुराक बंद आहे. शहरात असलेल्या हांडे पाटील तालीम, सरकारी तालीम, पवार तालीम, भोसले तालीम, वसंतदादा कुस्ती केंद्र, कवलापुरचे कुस्ती केंद्र या प्रत्येक ठिकाणी ५० ते १०० पैलवान राहण्यासाठी व कुस्ती प्रशिक्षणासाठी आहेत. यामध्ये जिल्ह्यातील पैलवान आहेतच, शिवाय राज्यातील सोलापूर, पुणे, धुळे, पंढरपूर आदी जिल्ह्यातील पैलवान शिकण्यासाठी रहायला असतात. मल्लांचा रोजचा खुराक म्हणजे थंडाई, अंडी, केळी, दुध, प्रोटीन्स, शाकाहारी, मांसाहारी आहार आदींसाठी होणारा खर्चही मोठा असतो. सर्व आहार तुपातला असतो. यासाठी मैदानातून मिळणाऱ्या रक्कमांवरच तो भागविला जातो. एका पैलवानाचा खर्च महिन्याकाठी ३० ते ३५ हजाराच्या घरात आहे. गावोगावच्या कुस्त्या मारून सिझनला एक पैलवान ५ ते १० लाख सहज कमावतो. पण सध्या मैदाने बंद असल्याने या पैलवानांचा खुराक व व्यायाम ठप्प आहे.
जिल्ह्यात व आजूबाजूच्या पंचक्रोशीत वर्षातील दहा महिने कुस्तीची छोटी-मोठी मैदाने होत असतात. सांगली शहर, कुंडल, बलवडी, पलूस, कवठेएकंद, पारे यासह अनेक छोट्या-मोठ्या गावच्या यात्रा, जत्रा, उरुस, वाढदिवस, वर्धापन दिन अशा महत्वाच्या दिवशी मैदाने होत असतात. कर्नाटक राज्यातही कुस्ती मैदाने भरवली जातात. श्रावण महिन्यापासून सुरू होणारी कुस्ती मैदाने मे महिन्यापर्यंत चालतात. पण यंदा कोरोनामुळे गेली सहा महिने कुस्तीगिरांना घरी बसण्याची वेळ आली आहे. कुस्तीवर अवलंबून असणारे हलगीवाले, फेटेवाले, निवेदक व त्यांच्या कुटुंबीयांचेही हाल होत आहेत. अनेक राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेता न आल्याने शासकीय कोठ्यातील नोकरीसाठीही अडचणी येत आहेत. नोकरीतील क्रीडा आरक्षणाचा लाभ घेता येईनासा झाला आहे. पंजाब येथे कुस्ती मैदाने होत असतात, महाराष्ट्रात मात्र ती बंद आहेत.
जिल्ह्यात होणारी कुस्ती मैदाने या पैलवानांचा आर्थिक स्त्रोत आहे. कोरोनामुळे अनेक गावची मैदाने हुकली असून मल्लांचा हा आर्थिक स्त्रोत बंद झाला आहे. त्यामुळे मल्लांना व्यायाम व खुराक पुन्हा सुरू करण्याची अडचण निर्माण झाली आहे. कुस्ती या क्षेत्राची सध्याच्या घडीला थांबलेली ऊर्जितावस्था पुन्हा निर्माण करण्याची आज गरज आहे. यासाठी कुस्तीप्रेमींनी पुढे येऊन सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याला असणारी कुस्ती परंपरा जपण्यासाठी अनेक मदतीचे हात सरसावण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला सारीच बिकट अवस्था असली तरी कुस्तीचा इतिहास, परंपरा, संस्कृती टिकवायची असेल तर कुस्ती मैदाने-स्पर्धा होण्याची गरज आहे.
आर्थिक आधाराची गरज
गेली दीड वर्षे जिल्ह्यातील पैलवानांना विविध तालमींचे मालक, जुने कुस्तीप्रेमी, हौशी लोक थोडीफार मदत करत असून, ही मदत तोकडी पडत आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट आहे, तोवर मल्लांना आर्थिक आधार देण्याची गरज आहे. – पै. सचिन बिसले, वस्ताद, सरकारी तालीम, सांगली
मैदाने सुरू होणे आवश्यक
कोरोनामुळे सध्या शहरासह अनेक ग्रामीण भागातील मल्लांनाही आर्थिक झळ पोहोचलेली आहे. गेली वर्षभराहून अधिक काळ व्यायाम व खुराक बंद असल्याने सध्या कुस्ती क्षेत्र संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. यासाठी तालमीतील प्रशिक्षणार्थी पैलवानांना आर्थिक मदत तर व्हावीच, शिवाय कुस्ती मैदानेही लवकर सुरु करण्याची गरज आहे. – पै. किरण भूजूगडे, उद्योजक, मिरज.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng