निवेदने देऊनही प्रशासनाचे दुर्लक्षच
नातेपुते (बारामती झटका)
सोलापूर व सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा पिलीव-शिंगणापूर हा रस्ता असुन या रस्त्यावर शिंगणापुरला जाण्यासाठी गुप्तलिंग घाट आहे. हा रस्ता शिंगणापुरला जाण्यासाठी अतिशय जवळचा असुन या रस्त्याने सतत वर्दळ असते. तसेच फडतरीतील विद्यार्थ्यांनाही शिंगणापुर, मोही येथे शाळेला याच मार्गाने ये-जा करावी लागते. परंतु हा घाट रस्ता अतिशय धोकादायक असुन जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. तरी हा घाट रस्ता त्वरीत करावा, अन्यथा फडतरी ग्रामस्थ आत्मदहन करणार असल्याचा इशारा उपसरपंच प्रा. दुर्योधन पाटील यांनी दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यालगतच सातारा जिल्हा असून सोलापूर जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना पहिले गाव शिंगणापूर आहे. शिंगणापूरला गुप्तलिंग मार्गे जाण्यासाठी जुना पिलिव-शिंगणापूर रस्ता आहे. जवळचा रस्ता असल्याने या रस्त्याने सतत वर्दळ असते. मात्र, हा रस्ता डेंजर अवस्थेमध्ये आहे. फडतरी-शिंगणापुर ए अमतर या गुप्तलिंग घाटातुन ६ किमी असून हा रस्ता सोडून शिंगणापुरला जायचे म्हटले तर फडतरी-नातेपुते व शिंगणापुर असा २५ किमीचा प्रवास करावा लागतो. म्हणजे ६ किमीच्या प्रवासासाठी २५ किमीचा प्रवास करावा लागतो. यामध्ये वेळ व पैसाही खर्च होतो. या रस्त्याने चैत्र महिन्यामध्ये अनेक कावडी जात असतात. त्यामुळे रस्त्यास चैत्र महिन्यामध्ये खूप गर्दी असते. हा रस्ता विशेषतः गुप्तलिंग घाटामध्ये खूपच कच्चा असुन भयानक आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहनधारकांसह इतरांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील महादेवाच्या डोंगररांगेच्या नजीकच्या गावांना कमी अंतर असल्याने शिंगणापुरला जाण्यासाठी हा रस्ता अतिशय सोयीस्कर आहे. यासाठी हा रस्ता होणे अतिशय गरजेचे आहे. या रस्त्याने फडतरीमधील अनेक विद्यार्थी चालत शिंगणापूर, मोही या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. तसेच अनेक नागरिकही दवाखान्यासाठी शिंगणापूरला जात असतात. तसेच गुप्तलिंग या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे फडतरी, लोंढे मोहितेवाडी या गावांमधील अनेक लोक पेट्रोल-डिझेल आणण्यासाठी याच रस्त्याने जातात. या रस्त्याने ये-जा करताना खूपच त्रास लोकांना सहन करावा लागत असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या वेळेस अनेक भाविक फलटण- जावली मार्गे शिंगणापूरला दर्शनासाठी येतात व नंतर गुप्तलिंगमार्गे फडतरी नातेपुते असे जातात. मात्र, लोकांना व्यवस्थित चालता पण येत नाही. हा घाट रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा, अशी मागणी फडतरी नागरिकांमधून होत आहे. हा रस्ता न झाल्यास सरपंच, उपसरपंचासह आत्मदहन करण्याचा इशारा फडतरी येथील उपसरपंच प्रा. दुर्योधन पाटील यांनी दिला आहे.
गुप्तलिंग घाट रस्त्याने शिंगणापुरला जाताना विद्यार्थ्यासह ग्रामस्थांना कसरत करावी लागत असून एखादी वाईट घटना घडल्यास प्रशासन याकडे लक्ष देणार का ? याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले असुन अजून याकडे दुर्लक्षच का ? एखादी घटना घडल्यास जबाबदार कोण ?, असा संतप्त सवाल ग्रामस्थातुन विचारला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng