गुरसाळे गावातील छत्रपती पाणीवापर संस्थेची शेतकऱ्यांवर आडमुठी भूमिका.

‘देवा तुझ्या दाराला उंबराच नाही, सांग कुठे ठेवू माथा ?’ अशी अवस्था शेतकऱ्यांची पाणी वापर संस्थेला कार्यालय नसल्याने झालेली आहे.

…अन्यथा बायकां-मुलांसह आत्मदहन करणार – रामचंद्र लहू झेंडे.

गुरसाळे ( बारामती झटका )

शासनाने पाणी वापर संस्था काढून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक फाट्यावर शेतकऱ्यांच्या पाणी वापर संस्था सुरू आहेत. मात्र गुरसाळे ता. माळशिरस येथील छत्रपती पाणीवापर संस्थेच्या आडमुठ्या धोरणामुळे व ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना हातातोंडाला आलेल्या पिकाला मुकावे लागत आहे. पिके वाळून चालली आहेत. ‘देवा तुझ्या दाराला उंबराच नाही, सांग कुठे ठेवू माथा ?’, अशी अवस्था शेतकऱ्यांची पाणी वापर संस्थेला कार्यालय नसल्याने झालेली आहे.

माळशिरस तालुक्यातील गुरसाळे हद्दीतील 39 फाटा यावर आठ दारे. या ठिकाणी 60 ते 70 एकर भिजणारे क्षेत्र आहे. सदरचा 8 दारी फाटा छत्रपती पाणी वापर संस्थेच्या अधिपत्याखाली आहे. सदरच्या क्षेत्रावरील शेतकरी यांनी वेळोवेळी पास काढलेले आहेत. मात्र, स्थानिक राजकारण सुरू करून संस्थेतील धनदांडग्यांनी स्वतःची शेती इतरांचे पाणी वापरून सुरू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय सुरू केलेला आहे. पाणी वापर संस्था होत आहे म्हटल्यावर संबंधित 39 फाट्यावरील आठ दारे येथील शेतकरी सदरच्या संस्थेमध्ये सहभागी झालेले होते.

संस्था अस्तित्वात आल्यापासून संस्थेचे कार्यालय गुरसाळे गावात कोठे आहे, याचा ठावठिकाणा नाही. चेअरमन, सचिव यांची भेट घेणे मुश्किल असते. शेतकऱ्यांनी पास व इतर कामासाठी कोठे भेटायचे, असा प्रश्न निर्माण झालेला असतो. पाणी वापराचा पास टाकण्याची मुदत संपून गेल्यानंतर संबंधित छत्रपती पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी शेतकऱ्यांना आपण पास टाकला नाही म्हणून पाणी मिळणार नाही, असे सांगून आठ दारे या ठिकाणी 39 फाट्याला माती टाकून बुजवून टाकण्यात आली आहेत. सदर ठिकाणी अनिल दत्तात्रय कोरडकर, रामचंद्र लहुजी झेंडे, समीर प्रकाश झेंडे, भारत विठ्ठल झेंडे व इतर शेतकरी उपस्थित होते. छत्रपती पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पूर्वकल्पना न देता सदरच्या दारावर माती टाकून बंद केलेले आहे. जलसंपदा विभाग अधिकारी व पाणी वापर संस्था यांची मिलीभगत आहे. धनदांडग्या शेतकऱ्यांकडून आर्थिक हितसंबंध असल्याने गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असल्याचे रामचंद्र लहुजी झेंडे यांनी सांगितले कि, जर जलसंपदा विभाग आणि पाणी वापर संस्था यांनी दोन दिवसात आठ दारावर टाकलेली बेकायदेशीर माती नाही काढली तर आम्ही बायका-मुलांसह आत्मदहन करणार असल्याचे पीडित शेतकरी यांनी सांगितले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article“टेस्ला” कंपनीच्या गाड्यांची, पार्टची निर्मिती व इतर संशोधन महाराष्ट्रात होणे हे महाराष्ट्रासाठी आवश्यक – रविकांत वरपे
Next articleह.भ.प. एकनाथ महाराज हांडे पंढरपूरकर यांचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here