गोरडवाडी गावचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा नवा संकल्प.

प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तृत्वाने समाजामध्ये कमी वयात नावलौकिक मिळविलेला आहे.

माळशिरस (बारामती झटका)

गोरडवाडी ता. माळशिरस, गावचे सर्वात तरुण वयात सरपंच पदावर विराजमान झालेले युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांचा वाढदिवसानिमित्त नवा संकल्प केलेला आहे. निश्चितपणे त्यांनी केलेला त्यांचा संकल्प पुढच्या वर्षी श्री बालाजी पूर्ण करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत स्वकर्तुत्वाने समाजामध्ये कमी वयात नावलौकिक युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड यांनी मिळविलेला आहे.

समाजामध्ये अनेकजण जन्मताच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात पदार्पण करून कमी वयात सरपंच झालेले आहेत. मात्र, खडतर प्रवास करून बिनविरोध सरपंच झालेले युवा नेतृत्व विष्णूभाऊ गोरड यांची माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. विष्णूभाऊ यांचा वाढदिवस 31 जानेवारी रोजी असतो. या दिवशी धर्मपत्नी मोनिका, मुलगी यशश्री व मुलगा यशराज यांच्या समवेत आंध्र प्रदेशातील तिरुपती श्री बालाजी दर्शनासाठी सहपरिवार जाऊन वाढदिवसानिमित्त नवा संकल्प केलेला आहे.

गोरडवाडी येथील सर्वसामान्य व शेतकरी दाम्पत्य नाना आप्पा गोरड व यमुना नाना गोरड यांना तीन मुले आणि एक मुलगी. त्यापैकी सर्वात लहान शेंडेफळ असणारे विष्णूभाऊ गोरड आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने विष्णूभाऊ यांचे वडील नाना गोरड यांनी वसई येथे मातीकाम केलेले होते. आई घरकाम करून, शेती व्यवसाय करून आपला प्रपंच सुस्थितीत चालवत होत्या. विष्णूभाऊ यांच्या अंगामध्ये लहानपणापासून संघटन कौशल्य, जिद्द व चिकाटी होती. त्यांनी 2008 ते 2010 या कालावधीत माळशिरस येथील बंडू पिसे यांच्या एसटी स्टँड जवळील जय भवानी हॉटेल येथे वेटर म्हणून काम केले होते. अशातच गोरडवाडी गावचे नेते शेतकरी संघटनेचे लक्ष्मणतात्या गोरड यांनी विष्णूभाऊ यांना मानस पुत्र मानले आणि विष्णू भाऊ यांना हॉटेलमधून घरी घेऊन गेले आणि विष्णूभाऊ यांनी लक्ष्मणतात्या गोरड व भिकाजी बाबा गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय व सामाजिक कार्याला सुरुवात केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत व चांदापुरी कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत विष्णूभाऊ यांनी युवकांचे संघटन करून तालुक्यातील युवकांची फळी मजबूत केलेली होती. त्यावेळेस त्यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्षपद होते. अध्यक्षपदाचा पुरेपूर उपयोग करून घेऊन माळशिरस पंचायत समितीच्या इमारतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा फडकलेला होता. अशा मध्येच विष्णूभाऊ गोरड यांचा बोलबाला माळशिरस तालुक्यामध्ये झालेला होता. विष्णूभाऊ यांचा मनमिळावू स्वभाव, सहकार्य करण्याची भावना, अडचणीत असणाऱ्याला मदत करणे, व्यवस्थित सल्ला देणे या स्वभावामुळे आणि मानस पुत्र मानणारे लक्ष्मणतात्या गोरड व भिकाजी बाबा गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूभाऊ यांनी राजकीय क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतली होती.

राजकारणामध्ये सदाभाऊ खोत आणि उत्तमराव जानकर यांचा राजकीय प्रभाव विष्णूभाऊ यांच्यावर पडलेला होता. योगायोगाने भाजप-शिवसेना व घटक पक्ष युतीचे सरकार महाराष्ट्रात होते. त्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पदभार होता. सदाभाऊ खोत यांचे ग्रामीण भागात अनेक कार्यकर्ते आहेत. त्यापैकी विष्णूभाऊ गोरड म्हणजे लाडका कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली होती. विष्णूभाऊ यांनी गोरडवाडी ग्रामपंचायतीला पाण्याची अडचण भासत होती, यासाठी सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली गावासाठी 93 लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. गावांमधील सर्वसामान्य शेतकरी यांच्यासाठी कांदाचाळी मधून जवळजवळ सत्तर लाख रुपये गावातील शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले होते. सदाभाऊ यांच्या आमदार फंडातून तीन लाख रुपये निधी रस्त्यासाठी मंजूर केला होता. विष्णूभाऊ यांचा राजकीय आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. त्यांचे शिक्षण बी.ए. पूर्ण झाले होते. मात्र, त्यांचा नोकरीकडे कल नव्हता. त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात आवड होती. विष्णूभाऊ गोरड यांची वयाची 25 वर्ष पूर्ण होण्याअगोदरच बिनविरोध सरपंच पदी विराजमान होण्याचा बहुमान मिळाला आहे.

माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये कमी वयात खडतर प्रवास करून बिनविरोध सरपंच झालेले विष्णूभाऊ यांची राजकीय इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. विष्णूभाऊ यांचा खडतर प्रवास वडील नाना आप्पा गोरड यांनी पाहिलेला आहे. मात्र, विष्णूभाऊ बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य आणि बिनविरोध गावचा सरपंच झालेला वडिलांना पाहता आला नाही. काही वर्षापूर्वी वडिलांचे दुःखद निधन झालेले आहे. आईला मात्र, आपल्या मुलाचे कोडकौतुक करताना पितृत्व आणि मातृत्वाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.

विष्णूभाऊ गोरड यांनी स्वकर्तुत्वाने दरिद्री संसाराचा स्वर्ग बनवलेला आहे. दिवसेंदिवस आर्थिक स्तोत्र निर्माण करून समाजामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. उद्योग व्यवसायामधून स्वतःची प्रगती करीत आहेत. वाढदिवसानिमित्त बायको, मुलगा आणि मुलीसह श्री बालाजी दर्शन करून नवीन संकल्प मनामध्ये केलेला आहे. निश्चितपणे भविष्यात नवा संकल्प पूर्ण होण्याकरता बारामती झटका परिवार यांचेकडून हार्दिक शुभेच्छा…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर युवक कार्याध्यक्षपदी शहाजी खडतरे तर, महिला आघाडी शहराध्यक्षपदी जयश्री गायकवाड यांची निवड
Next articleपाणीदार खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नागरी सत्काराचे निमंत्रण आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांना देण्यासाठी शिवरत्नवर शिष्टमंडळ दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here