गोरडवाडी गावच्या सरपंचपदी विष्णूभाऊ गोरड यांची सर्वानुमते निवड.

माळशिरस येथील जय भवानी हॉटेलचा वेटर ते गोरडवाडी गावचे बिनविरोध सरपंच विष्णू भाऊयांचा खडतर राजकीय प्रवास.

जन्मताच सोन्याचा चमचा तोंडात घेणारे कमी वयात सरपंच झाले मात्र, खडतर प्रवास करून बिनविरोध सरपंच झालेले युवा नेतृत्व विष्णूभाऊ गोरड यांची तालुक्याच्या इतिहासात नोंद


गोरडवाडी ( बारामती झटका )

गोरडवाडी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गावातील सर्व नेते, कार्यकर्ते व सदस्य यांच्या सर्वांमध्ये युवानेते विष्णूभाऊ गोरड यांना विराजमान होण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे. समाजामध्ये अनेकजण जन्मताच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन राजकारणात पदार्पण करून कमी वयात सरपंच झालेले आहेत. मात्र, खडतर प्रवास करून बिनविरोध सरपंच झालेले युवा नेतृत्व विष्णूभाऊ गोरड यांची माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये नोंद झालेली आहे.
गोरडवाडी येथील सर्वसामान्य व शेतकरी दाम्पत्य नाना आप्पा गोरड व यमुना नाना गोरड यांना तीन मुले आणि एक मुलगी. त्यापैकी सर्वात लहान शेंडेफळ विष्णूभाऊ गोरड आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने विष्णूभाऊ यांचे वडील नाना गोरड यांनी वसई येथे मातीकाम केलेले आहे. आई घरकाम करून, शेती व्यवसाय करून आपला प्रपंच सुस्थितीत चालवत होत्या. विष्णूभाऊ यांच्या अंगामध्ये लहानपणापासून संघटन कौशल्य, जिद्द व चिकाटी होती. त्यांनी 2008 ते 2010 या कालावधीत माळशिरस येथील बंडू पिसे यांच्या एसटी स्टँड जवळील जय भवानी हॉटेल येथे वेटर म्हणून काम केले होते. अशातच गोरडवाडी गावचे नेते शेतकरी संघटनेचे लक्ष्मणतात्या गोरड यांनी विष्णूभाऊ यांना मानस पुत्र मानले आणि विष्णू भाऊ यांना हॉटेलमधून घरी घेऊन गेले आणि विष्णूभाऊ यांनी लक्ष्मणतात्या गोरड व भिकाजी बाबा गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय व सामाजिक कार्याला सुरुवात केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत व चांदापुरी कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत विष्णूभाऊ यांनी युवकांचे संघटन करून तालुक्यातील युवकांची फळी मजबूत केलेली होती. त्यावेळेस त्यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक अध्यक्षपद होते. अध्यक्षपदाचा पुरेपूर उपयोग करून घेऊन माळशिरस पंचायत समितीच्या इमारतीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा फडकलेला होता. अशा मध्येच विष्णूभाऊ गोरड यांचा बोलबाला माळशिरस तालुक्यामध्ये झालेला होता. विष्णूभाऊ यांचा मनमिळावू स्वभाव, सहकार्य करण्याची भावना, अडचणीत असणाऱ्याला मदत करणे, व्यवस्थित सल्ला देणे या स्वभावामुळे आणि मानस पुत्र मानणारे लक्ष्मणतात्या गोरड व भिकाजी बाबा गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूभाऊ यांनी राजकीय क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतली होती. राजकारणामध्ये सदाभाऊ खोत आणि उत्तमराव जानकर यांचा राजकीय प्रभाव विष्णूभाऊ यांच्यावर पडलेला होता. योगायोगाने भाजप-शिवसेना व घटक पक्ष युतीचे सरकार महाराष्ट्रात होते. त्या मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे पदभार होता. सदाभाऊ खोत यांचे ग्रामीण भागात अनेक कार्यकर्ते आहेत. त्यापैकी विष्णूभाऊ गोरड म्हणजे लाडका कार्यकर्ता अशी त्यांची ओळख निर्माण झालेली होती. विष्णूभाऊ यांनी गोरडवाडी ग्रामपंचायतीला पाण्याची अडचण भासत होती, यासाठी सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली गावासाठी 93 लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. गावांमधील सर्वसामान्य शेतकरी यांच्यासाठी कांदाचाळीमधून जवळजवळ सत्तर लाख रुपये गावातील शेतकऱ्यांना अनुदान मिळवून दिले होते. सदाभाऊ यांच्या आमदार फंडातून तीन लाख रुपये निधी रस्त्यासाठी मंजूर केला होता. विष्णूभाऊ यांचा राजकीय आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला होता. त्यांचे शिक्षण बी.ए. पूर्ण झाले होते. मात्र, त्यांचा नोकरीकडे कल नव्हता. त्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात आवड होती. अशामध्येच गोरडवाडी ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्व नेते व तरुण मंडळींनी एकत्र येऊन ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा संकल्प केला. सर्वांनी आपापसातील हेवेदावे बाजूला सारून गावाच्या विकासासाठी एकाच घोंगड्यावर येऊन ग्रामपंचायतीचे अकरा सदस्य बिनविरोध निवडून देऊन माळशिरस तालुक्याला गोरडवाडी गावाने आदर्श निर्माण करुन दिलेला होता. गावामध्ये गोरड व हुलगे दोन राजकीय गट आहेत. त्या दोन्ही गटाचे सरपंच उपसरपंच यांचा कालावधी ठरलेला आहे. पहिल्या सरपंच यांचा कालावधी संपल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंचपदी विष्णूभाऊ गोरड यांची निवड झालेली आहे. विष्णूभाऊ यांना अजून काही महिने शिल्लक आहेत. 25 वर्ष पूर्ण होण्याकरता पंचविसाव्या वर्षी बिनविरोध सरपंच पदी विराजमान होण्याची सुवर्णसंधी त्यांना मिळालेली आहे. माळशिरस तालुक्याच्या राजकीय इतिहासामध्ये कमी वयात खडतर प्रवास करून बिनविरोध सरपंच झालेले विष्णूभाऊ यांची राजकीय इतिहासामध्ये नोंद झालेली आहे. विष्णूभाऊ यांचा खडतर प्रवास वडील नाना आप्पा गोरड यांनी पाहिलेला आहे. मात्र, विष्णू भाऊ बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य आणि बिनविरोध गावचा सरपंच झालेला वडिलांना पाहता आला नाही. वर्षापूर्वी वडिलांचे दुःखद निधन झालेले आहे. आईला मात्र, आपल्या मुलाचे गोड कौतुक करताना पितृत्व आणि मातृत्वाची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. विष्णूभाऊ यांची बिनविरोध सरपंच पदी निवड होताच कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळीपूर्वी गोरडवाडी पंचक्रोशीत विष्णूभाऊ यांच्या निवडीची दिवाळी मित्र मंडळाने साजरी केलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमोहनशेठ विरकर यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने संपन्न…
Next articleअवैद्य वाळू साठ्याकडे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची जाणीवपूर्वक डोळेझाक जनतेचा आरोप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here