Uncategorizedताज्या बातम्या

‘घृणा सोडा’ नारा दिला नाही तर, देश पुन्हा एकदा गुलाम बनेल – तुषार गांधी

तुषार गांधी यांचा पहिल्या ‘जिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्काराने’ सन्मान

पुणे (बारामती झटका)

सध्या नव्या भारताची संकल्पना मांडली जात आहे पण या नव्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असूच शकणार नाहीत तर नव्या भारताचे प्रणेते नथुराम गोडसे असतील, अशी भीती महात्मा गांधी यांचे पणतू व अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचे उपासक तुषार अरुण गांधी यांनी व्यक्त केली. देशात सध्या घृणेचे राजकारण सुरू आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’ चा नारा दिला त्याप्रमाणे ‘घृणा सोडा’ असा नारा दिला जाण्याची आज गरज आहे. नाहीतर, भारतीय पुन्हा एकदा गुलाम बनतील असे त्यांनी उद्वीग्नपणे नमूद केले.

जैन धर्माचे गाढे अभ्यासक स्व. सुखलालजी फौजमलजी खाबिया यांच्या स्मरणार्थ श्री जैन सामुदायिक उत्सव समिती व श्री सकल जैन संघ, पुणेच्या वतीने गांधी यांना पहिल्या ‘जिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. विजय तेंडुलकर सभागृहात आयोजित सोहळ्यात पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी संत साहित्य, जैन तत्त्वज्ञान व इतिहासाचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे होते. ५१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्यासह अचल जैन, विजयकांत कोठारी, मिलिंद फडे, लक्ष्मीकांत खाबिया, अभय छाजेड, आमदार रवींद्र धंगेकार व्यासपीठावर होते.

गांधीवादी विचारांचे दुकान मांडून बसलेल्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांना बदनाम केले आहे, असे सांगून तुषार गांधी म्हणाले, गांधी विचारांच्या प्रचार प्रसाराचे कार्य माझ्याकडून पाहिजे त्या प्रमाणात झाले नसल्याने हा पुरस्कार स्वीकारण्यास मी योग्य नाही. मी जे ६० वर्षांत करू शकलो नाही ते संकेत मुणोत या युवकाने केल्याचे त्यांनी गौरवाने सांगितले. ते पुढे म्हणाले, महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांविषयी दररोज नवनवे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आज कुठल्या प्रश्नाला उत्तर द्यावे लागेल याविषयी दडपण असते. मराठी भाषेत गांधीवध असा शब्दप्रयोग केला जातो या शब्द प्रयोगाला आक्षेप व्यक्त करून ते म्हणाले, हत्या आणि वध यामध्ये फरक आहे. वध राक्षसाचा केला जातो तर हत्या सामान्य व्यक्तीची केली जाते, हे जाणून घेऊन हा शब्दप्रयोग टाळावा.

जैन धर्माचे गाढे अभ्यासक स्व. सुखलालजी फौजमलजी खाबिया यांच्या स्मरणार्थ श्री जैन सामुदायिक उत्सव समिती व श्री सकल जैन संघ, पुणेच्या वतीने पहिल्या ‘जिन महावीर ज्ञान-विज्ञान पुरस्कार’ वितरण सोहळ्यात विजयकांत कोठारी, अचल जैन, उल्हास पवार, सदानंद मोरे, पृथ्वीराज चव्हाण, तुषार गांधी, लक्ष्मीकांत खाबिया, अभय छाजेड, मिलिंद फडे, रवींद्र धंगेकर ,प्रमोद दोशी, वैभव शहा व सकल जैन समाज आदी उपस्थित होते

बापूंवर महावीरांच्या विचारांचा पगडा होता. कारण त्या विचारांमध्ये सर्वधर्मातील विचारांचा स्वीकार आहे, असे गांधी यांनी आवर्जून नमूद केले. बापूंनी अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास केला, संशोधन केले आणि त्यातील घेण्यायोग्य गोष्टी आत्मसात केल्या. भूतकाळात अनेक महनीय व्यक्तींनी मोठे कार्य केले आहे. आता वर्तमानाची चिंता करणे आवश्यक आहे, कारण भविष्यात युवा पिढीला आपण काय विचार, आदर्श देणार आहोत हे वर्तमानातील कृतींवरून ठरणार आहे. बापूंनी सांगितलेल्या अहिंसेचा पूर्ण अर्थ समजून मग ती आचरणात आणणे गरजेचे आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. परम अहिंसा हे तत्त्व पुन्हा आचरणात आणणे ही काळाची गरज असल्याचे गांधी म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महात्मा गांधी यांनी भगवान महावीर यांच्या शिकवणीचा अभ्यास करून समाजपरिवर्तनाचा प्रयत्न केला. तुषार गांधी हे फक्त गांधी परिवाराचे सदस्य नसून ते महात्मा गांधी यांची शिकवण समाजापर्यंत नेऊन मूलभूत बदल घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्र सरकारने पाठ्यपुस्तकांमधून महात्मा गांधी यांचे संदर्भ गाळल्याचा उल्लेख करून चव्हाण म्हणाले, महात्मा गांधी यांच्या विचारांचा तसेच स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा पुन्हा एकदा अभ्यास होणे गरजेचे आहे. महात्मा गांधी यांचे तत्त्वज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक गुणात्मक उपक्रम राबविणे आवश्यक आहे. आजचे राजकारण निराशादायक असून लोकशाही तत्त्वालाच धोका निर्माण झाला असल्याचे ते म्हणाले.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, अध्यात्म आणि व्यावहारीक ज्ञान वेगळे समजले जाते. परंतु महात्मा गांधी यांनी या दोन्हीत नाते जोडायचा आणि व्यवहाराला आध्यात्मिक बैठक देण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांचे राजकारण पंडित नेहरू यांनी तर अध्यात्म विनोबा भावे यांनी आत्मसात केल्याचे ते म्हणाले. आजच्या काळात अध्यात्माच्या मार्गदर्शनातून राजकारण करणे कमी झाले आहे हा सेतू पुन्हा जोडला गेला पाहिजे. पिढ्यान्‌‍पिढ्या भांडवलवादी विचार पुढे जात राहिले परंतु गांधीवादी विचारांची मांडणी परत-परत होणे आवश्यक आहे, अशी आग्रही भूमिका घेऊन त्यांनी मत व्यक्त केले.

उल्हास पवार म्हणाले, महात्मा गांधी यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांचे कुटुंबिय पुढे नेत आहेत यातूनच महावीरांचे विचारही पुढे जात आहेत. गांधीजींनी मांडलेला अनेकांतवाद पुन्हा एकदा शिकविण्याची तसेच नम्रता, क्षमाशिलता या विचारांची आज समाजाला गरज आहे.

अचल जैन यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करताना उपक्रमाविषयी माहिती दिली तर लक्ष्मीकांत खाबिया यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. पुढील 15 वर्षे हा पुरस्कार खाबिया परिवारतर्फे पुरस्कृत केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रास्ताविक मिलिंद फडे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत अचल जैन, अनिल गेलडा, अभय छाजेड, भरत शहा, महावीर कटारिया, विजयकांत कोठारी, लक्ष्मीकांत खाबिया यांनी केले. पुरस्काराचे नाव सुचविणारे डॉ. शैलेश गुजर व गांधी विचारांचा प्रचार व प्रसार करणारे युवा कार्यकर्ते संकेत मुणोत तसेच पुरस्काराची रक्कम पुरस्कृत केल्याबद्दल दिलीप खाबिया यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार डॉ. शैलेश गुजर यांनी मानले. पुरस्कार समितीत डॉ. शैलेश गुजर, युवराज शहा, जितेंद्र शहा, नितीन जैन, निलेश शहा, भरत सुराणा, जिनेंद्र कावेडिया, प्रशांत गांधी, अरुण कटारिया, अभिजित डुंगरवाल यांचा समावेश आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort