मुंबई (बारामती झटका)
कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घालूनही अद्याप त्याला नियंत्रणात आणण्याचा वैद्यकीय उपाय सापडला नसताना कोरोनाचाच आणखी एक धोकादायक प्रकार संशोधकांना आढळून आला आहे. या विषाणूमध्ये स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असल्याने त्यावर औषध शोधणे हे एक आव्हान आहे.
टाइप ए
हा प्रकार म्हणजे कोरोना विषाणूचे गुणसूत्र असून ते वुहानमधील विषाणू मध्ये आढळले होते. यात बदल घडून आला (म्युटेशन) आणि तो वुहानमध्ये राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांमध्ये संक्रमित झाला. त्यांच्यामार्फत तो अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात पोहोचला.
टाईप बी
पूर्व आशियात कोरोना विषाणूचा हा प्रकार फैलावला. मात्र, येथून तो जगात इतरत्र संक्रमित झाला नाही.
टाईप सी
याचा सर्वाधिक प्रसार यूरोपात आणि त्यातही फ्रान्स, इटली, स्वीडन आणि ब्रिटनमध्ये झाला. हा विषाणूचा प्रकार ब्रिटन मधून जर्मनीत आणि तिथून सिंगापूरमध्ये संक्रमित झाला.
कशाकडे लक्ष देणे आवश्यक ?
विषाणू स्वतःमध्ये बदल करत असल्याने रुग्णावर परिणाम वेगवेगळा होत आहे. त्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. कोरोनाने आत्तापर्यंत स्वतःचे तीस प्रकार विकसित केले आहेत. त्यामुळेच औषध शोधायला अवघड जात आहे.
कोणी व कोठे झाले संशोधन ?
चीनमधील झेजियांग विद्यापीठातील संशोधक प्रा. लांजुआन यांनी अकरा कोरोनाग्रस्तांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. कोरोना विषाणूने स्वतःच्या रचनेत बदल करण्याची क्षमता विकसित केल्याने तो अधिक धोकादायक झाला असल्याचे प्रा. लांजुआन यांनी सांगितले. युरोपातील काही रुग्णांमध्येही हा विषाणू आढळला असला तरी अद्याप याकडे कोणी फारसे लक्ष दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. वुहानमधुन संसर्ग जगभर पसरू शकतो, असा इशारा लांजुआन यांनीच सर्वप्रथम दिला होता.
केंब्रिज विद्यापीठाचाही शोध
चीन आधीही केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनीही कोरोना विषाणूचे तीन प्रकार शोधून काढले आहेत. या तीन प्रकारांचे जगभरात संक्रमण झाले आहे. यासाठी संशोधकांनी कोरोनाग्रस्तांच्या पेशींचा अभ्यास केला.
भारतात एकच प्रकार
भारतात अद्यापही कोरोना विषाणूचा एकच प्रकार आहे. त्यामुळे त्याला आटोक्यात आणल्यास भारतात संसर्ग रोखला जाऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.
का आहे धोकादायक ?
*स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता
*संक्रमणाची पद्धत बदलत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng