इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
उदमाईवाडी (ता.इंदापूर) जवळील नीरा डाव्या कालव्याच्या ३६ क्रमांकाच्या वितरिकेच्या पाण्यात पडलेल्या दोन वर्षाच्या शौर्य पांडुरंग चव्हाण या चिमुरड्याला बारावीत शिकणाऱ्या समर्थ बापूराव शिंदे या धाडसी तरुणाने पाण्याबाहेर काढून चिमुरड्याचा जीव वाचविला होता. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी शिंदे आणि चव्हाण कुटुंबाची भेट घेऊन समर्थ शिंदेचा यथोचित सन्मान केला.
बुधवारी (ता.१५) रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शौर्य चव्हाण व त्याचा अडीच वर्षाचा चुलत भाऊ कृष्णा चव्हाण खेळत-खेळत वितरिकेच्या जवळ गेले होते. अचानक शौर्यचा पाय घसरल्याने शौर्य वितरिकेच्या पाण्यात पडला होता. यावेळी वितरिकेजवळून इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणारा समर्थ शिंदे हा तरुण व्यायामासाठी चालला होता. नागरिकांच्या ओरडण्याचा आवाज कानी पडताच क्षणाचाही विलंब न करता वितरिकेमध्ये उडी टाकून त्याने छोट्या शौर्यला पाण्यातून अलगद बाहेर काढले होते. समर्थच्या तत्परतेमुळे एका चिमुरड्याचा जीव वाचला होता. प्रसंगावधान दाखवून समर्थने दाखवलेल्या धाडसाचे राजवर्धन पाटील यांनी कौतूक केले व त्याचा शाल, श्रीफळ व फेटा देऊन सत्कार केला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng