सातारा (बारामती झटका)
रयत शिक्षण संस्थेचे, छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा भूगोलशास्त्र विभाग व माजी विद्यार्थी संघ यांच्या सयुंक्त विद्यमाने माजी विद्यार्थी स्नेह मेळावा (स्मृतिगंध) बी.ए. भाग ३, बॅच २००१-०२ चा दि. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ हे कॉलेजचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त माजी विद्यार्थी एकत्र येत आहेत. या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब हे उपस्थित होते. त्यांनी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक आणि स्वागत माजी विद्यार्थी समितीचे चेअरमन व माजी विद्यार्थी संघाचे सचिव डॉ. अभिमान निमसे यांनी केले. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. प्राचार्य आर.डी. गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनामुळे संघ यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. याचा महाविद्यालयास व आम्हास सार्थ अभिमान आहे, असे डॉ. निमसे यांनी प्रास्ताविकात सांगितले. तसेच कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. अनिलकुमार वावरे उपस्थित होते. त्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा
आलेख माजी विद्यार्थ्यांना सांगितला तसेच भूगोल विभागाच्या यशस्वी वाटचालीची पूर्ण माहिती दिली. महाविद्यालयाच्या उज्वल यशामध्ये माजी विद्यार्थ्याचे नेहमीच महत्वाचे योगदान आहे, असेही प्रो.डॉ. अनिलकुमार वावरे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. कार्यक्रमावेळी उपप्राचार्य डॉ. रामराजे माने-देशमुख उपस्थित होते. भूगोलशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर. आर. साळुंखे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख आणि विभागाची माहिती सांगितली. महाविद्यालयाच्या “कमवा व शिका” योजनेचे माजी विद्यार्थी व रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य मा.रामशेठ ठाकूर साहेब यांनी गतवर्षी रुपये ५ कोटीची भव्य आणि सुंदर इमारत बांधून दिली आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सध्या तेथे वर्ग सुरू झाले आहेत. त्याबद्दल आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी मा. रामशेठ ठाकूर साहेबांचे कौतुक व अभिनंदन केले. या मेळाव्याचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. रामराजे माने-देशमुख, डॉ. धनंजय नलवडे, प्रा. हिरोजी देशमुख, डॉ. अभिमान निमसे, डॉ. अभिजित पोरे,
डॉ. सुभाष कारंडे, डॉ. सुधाकर कोळी, प्रा. संदीप कोळेकर, प्रा. पांडुरंग व्हटकर, प्रा. दशरथ जाधव तसेच संघाचे खजिनदार प्रा. बाळासाहेब वाघ उपस्थित होते.
उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत डॉ.धनंजय नलवडे यांनी महाविद्यालयाचा शिवविजय अंक आणि गुलाबपुष्प देऊन केले. तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. आलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक, प्रोजेक्ट मॅनेजर, प्राध्यापक, गृहिणी, शेतकरी, न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विमा प्रतिनिधी, केअर हेल्थ व्यवस्थापक, सैन्यदल अशा विविध क्षेत्रात विद्यार्थी कार्यरत आहेत. या मेळाव्यावेळी सौ. आशा सकुंडे आणि श्री. महेश जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मनोगतातून
त्यांनी महाविद्यालयाच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला. आम्हाला मिळालेल्या यशामध्ये छत्रपती शिवाजी कॉलेजचा मोठा वाटा आहे, असे त्यावेळी त्यांनी सांगितले. कर्मवीरांनी सर्वप्रथम सुरु केलेल्या या महाविद्यालयाने आज केलेली प्रगती पाहून माजी विद्यार्थी आनंदाने भारावून गेले. येथील कमवा व शिका योजना म्हणजे साक्षात संस्कार मंदिरच आहे असे वर्णन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. प्रदीर्घ अशा १९ वर्षानंतर एकत्र आल्यावर आज आम्हा सर्वाना खूप आनंद झाला तो शब्दात व्यक्त करता येणे शक्य नाही. नेहमी
आम्ही कॉलेजच्या विकासासाठी मदत करत राहू अशा भावना त्यांनी मनोगतातून व्यक्त केल्या. जीवन जगण्याची खरी ताकद या महाविद्यालयाने आम्हाला दिली आहे, असेही अनेक माजी विद्यार्थ्यांनी या मनोगतातून सांगितले. श्री. साईनाथ शेटे, डॉ. प्रवीण जाधव, श्री. नामदेव शिर्के यांनी सर्वाना संपर्क करून माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित केले. डॉ. अभिजित पोरे यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. डी.बी. नलवडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng