कणकवली (बारामती झटका)
श्री कृपेकरुन श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळ, वरची वाडी, कणकवली येथे सार्वजनिक सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमीत्ताने सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्र महिला दशावतार प्रस्तुत महान काल्पनिक नाटक विधीलेख सादर करण्यात आले. कोकण ही परशुरामांची पुण्यभूमी. या भूमीत अनेक कला उदयास आल्या. दशावतार ही त्यातीलच एक कला. कोकणची ही पारंपरिक कला जतन करण्याचे कोकणातील काही महिला दशावताराच्या माध्यमातून करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सिंधुरत्न फाऊंडेशन प्रस्तुत विधीलेख या महिला दशावताराचे नाट्य प्रयोग होत आहेत. श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून विधीलेख या महिला दशावतार नाटकातील कलावंतांचा जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करुन गौरवांकीत करण्यात आले आहे.
‘विधीलेख’ या महिला दशावतार नाटकातील कलाकार राजा धर्मपाल आणि ऋषी – सौ. लक्ष्मी गवस, राणी सत्यवती – सौ. साक्षी आमडोसकर, सुर्यसेन – कु. शिवानी डीचोलकर, चंद्रसेन – कु. मानसी कांबळे, चंद्रप्रभा – कु. अनिशा राऊळ, वैभव – कु. सुप्रिया पाटील, आणि चित्रसेनच्या प्रमुख भुमिकेत सुप्रसिद्ध अष्टपैलु अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच लेखक आणि दिग्दर्शक – प्रकाश तांबे, निर्माता सिद्देश कांबळी, हार्मोनियम – मंगेश ठाकुर, पखवाज – प्रथमेश तांबे, ताल रक्षक – सागर मेस्त्री, डीओपी – रविकिरण शिरवलकर, विशेष सहकार्य – अनुज कांबळी यांनाही सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळालाही विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री देव ब्राम्हणेश्वर मंदिर मित्र मंडळाचेे आयोजक व त्यांचे सर्व सहकारी व समितीचे सल्लागार आत्माराम नाटेकर, अनिल कांबळी यांचे विशेष सहकार्य लाभले. शेवटी अष्टपैलु अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी सर्वांचे आभार मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng