बारामती झटका वेबपोर्टलचे दिड कोटीच्यावर वाचक व यूट्यूब चॅनल अष्टयाहत्तर लाखांवर प्रेक्षक असणाऱ्या प्रसार माध्यमाचा सन्मान.
माळशिरस ( बारामती झटका )
बारामती झटका वेबपोर्टल वाचकांची संख्या 1 कोटी 50 लाखांवर आणि यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 78 लाखांवर असणाऱ्या लोकप्रिय व निर्भीड, निपक्षपाती बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना ठाणे जिल्ह्यातील हान्ड्रोपाडा बदलापूर ( पश्चिम ) येथील जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्यावतीने पत्रकारीतेचा गौरव पुरस्कार व सन्मानपत्र देऊन करण्यात आला आहे.
जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या सन्मान पत्रामध्ये श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील संपादक बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल आपणांस जनजागृती सेवा समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्षे समाजप्रबोधनाचे कार्य निरपेक्षपणे आणि निस्वार्थीपणे करत आहात. आपल्या या सेवाभावी कार्याची दखल घेऊन आपणांस पत्रकारितेतील हे मानाचे सन्मानपत्र देताना आम्हाला आनंद होत आहे. आपले कार्य नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या सारख्या निर्भीड पत्रकारांमुळेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही भक्कम आहे. जनसेवेचे व्रत घेतलेल्या पत्रकारांच्या लेखणीला सामर्थ्यवान आणि बलशाही करण्याच्या उदात्त हेतूने आपला हा यथोचित सन्मान करण्यात येत आहे. आपल्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा अशा आशयाचे हे सन्मानपत्र देण्यात आले आहे.

श्रीनिवास कदम पाटील यांनी 2008 साली पत्रकारितेला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीस पाक्षिक साळूबाई वार्तापत्र या नावाने वर्तमानपत्र सुरू होते. पंधरा दिवसातून एकदा निघणारे पाक्षिक लोकांना वाचनीय ठरले. वाचकांचा उदंड प्रतिसाद पाहून बारामती झटका साप्ताहिक सुरु करण्यात आले. आठ दिवसात प्रसारित होणारे बारामती झटका साप्ताहिक यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. प्रिंट मीडिया, टीव्ही मीडिया नंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्त्व प्रचंड वाढलं आहे. येणाऱ्या काळात या माध्यमांचे महत्त्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्याने बारामती झटका या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर करून बारामती झटका वेबपोर्टल या न्यूज पोर्टलची सुरुवात केली. वाचकांचा उदंड प्रतिसाद असून गेल्या तीन वर्षापासून सुरू केलेल्या बारामती झटका वेबपोर्टल वाचकांची संख्या एक कोटी पन्नास लाखांवर गेलेली आहे. पोर्टलचा उदंड प्रतिसाद पाहता यूट्यूब चॅनल प्रेक्षकांसाठी सुरु केले. यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 78 लाखांवर गेलेली आहे. दिवसेंदिवस बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल लोकाभिमुख होत आहे.
बारामती झटकाचे मुख्य कार्यालय अकलूज येथे पहिल्या मजल्यावर आहे. विभागीय कार्यालय माळशिरस येथे दुसऱ्या मजल्यावर आहे, पुणे जिल्हा संपर्क कार्यालय बारामती येथे तिसऱ्या मजल्यावर आहे. लवकरच पश्चिम महाराष्ट्राचे कार्यालय पुणे येथे चौथ्या मजल्यावर काढण्याचा मनोदय आहे. वाचकांच्या व प्रेक्षकांच्या पसंतीस असलेले बारामती झटका परिवाराचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांना जनजागृती सेवा समितीच्या वतीने पुरस्कार व सन्मानपत्र दिलेला असल्याने भावी कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव अनेक स्तरातून होत आहे. बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल ची वेगाने घोडदौड सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng