जनसामान्यांच्या संघर्षासाठी उभे राहणारे झुंजार नेतृत्व म्हणजे लोकनेते स्व. प्रतापसिंह मोहिते पाटील

जगण्यासाठी स्वाभिमान आणि लढण्यासाठी आभाळभर ताकत देणारे, कार्यकर्त्यांच्या पाठीवर आपुलकीची थाप मारून नेतृत्व घडविण्याची किमया करणारे लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांची आज जयंती, त्यानिमित्त…

माळशिरस (बारामती झटका)

काळ्या मातीचा, निधड्या छातीचा अन् अठरा पगड जातीचा असा हा सोलापूर जिल्हा. सहकारातून समृद्धीची ओळख सांगणारी इथली माणसं. महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीचा एकेकाळी जणू कणाच ठरलेल्या सहकाराचे बीज या जिल्ह्यात पहिल्यांदा सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी रोवलं. अशा या कर्तबगार मोहिते पाटील कुटुंबात दि. २५ जून १९५७ रोजी प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा जन्म झाला. भोळ्याभाबड्या, कष्टकरी, अडाणी माणसांची छोटी छोटी स्वप्नं आणि त्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची धमक असणारे शंकरराव मोहिते पाटील. लहानपणापासूनच त्यांनी प्रतापसिंहाना मोठमोठी स्वप्न पहायला शिकवली, त्यांच्या स्वभावातील आक्रमकता आणि त्यांची शब्दांवरील पकड पाहून अनेकांना त्यांच्यामध्ये शंकररावच दिसत असत. कमवलेले शरीर आणि राजबिंडा चेहरा असलेल्या प्रतापसिंहाना पुढे ‘पप्पासाहेब’ या लाडक्या नावाने ओळखले जाऊ लागले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आपल्या नेतृत्व कौशल्यामुळे आणि माणसे जोडण्याच्या स्वभामुळे ते तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले. ते उत्तम कबड्डी खेळत असत. विरोधी संघाच्या गोटात शिरून चढाई करत बोनस गुण मिळवणे ही त्यांची खासियत होती. हीच खासियत त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीत सुद्धा दिसून आली. ‘जीवात जीवमान असेपर्यंत जनसेवाच करू’ हा जनसेवेचा मूलमंत्र घेऊन त्यांनी १९७५ साली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेची स्थापना केली. पुढे जनसेवा संघटनेच्या माध्यमातून केलेले काम आणि त्यांच्यातील नेतृत्वगुण पाहून त्यांना सर्वप्रथम १९८४ ते १९९१ या काळात जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली. जनसामान्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडून ते सोडवून घ्यायची हातोटी प्रतापसिंहांच्या अंगी होती. पूर्वी ‘धरण उशाला अन, कोरड घशाला’ अशी माढा तालुक्याची परिस्थिती होती. १९८७ साली उजनी धरणाचे पाणी माढा तालुक्याच्या दुष्काळी भागास मिळवुन देण्यासाठी प्रतापसिंहांनी मोठे जनआंदोलन उभा करून या भागाला पाणी मिळवून दिले, पाणी मिळाले परंतु पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने त्याचा सिंचनासाठी उपयोग होत नव्हता. म्हणून त्यांनी १९८८ ला भव्य रास्ता रोको आंदोलन व सायकल मोर्चा काढून हा प्रश्न निकाली लावला. शेतकऱ्यांबरोबरच बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी आणि रोजगार विनिमय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. स्वतः शेतकरी असल्याने ग्रामीण भागातील समस्यांची त्यांना जाण होती.

जिल्ह्याला एक युवा आणि आक्रमक चेहरा प्रतापसिंहांच्या माध्यमातून मिळाला होता. यातूनच ते १९९२ साली सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा खूप गाजला. २८ व्या क्रमांकावर असलेली जिल्हा परिषद त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आली. विशेष बाब म्हणजे एकाच वर्षात एकूण ११७३ शाळा बांधण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. जिल्ह्यात ३७६ नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण केल्या आणि १३४ गावे टँकरमुक्त केली. ही विकासाची वाटचाल करीत असताना स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातील लोकांशी मैत्रीचे संबंध ठेवले, याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात प्रथम जिल्हा परिषदेमध्ये पक्षनेतेपद, विरोधीपक्ष नेतेपद ही पदे निर्माण केली आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभा केले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी जेव्हा महाराष्ट्रात संघर्ष उभा राहिला होता तेव्हा याच्या समर्थनार्थ पहिला ठराव मंजूर केला तो सोलापूर जिल्हा परिषदेने.

महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठी दुर्घटना म्हणजे १९९३ साली लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे झालेला भूकंप. आपल्या शेजारील जिल्ह्यात आपली मदत ही तातडीने पोहचली पाहिजे म्हणून पायाचे ऑपरेशन झालेल्या परिस्थितीत जनसेवेच्या हजारोंच्या फौजेसह प्रतापसिंह मदतकार्यासाठी सर्वप्रथम धावून गेले. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढून त्यांच्या अन्न, वस्त्र निवाऱ्याची सोय करतानाचे, एका हातात काठी घेऊन मदतीला धडपडणारे, संवेदनशील पप्पासाहेब आजही डोळ्यासमोर तसेच उभा राहतात. एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांची दखल दिल्लीच्या पक्षनेतृत्वाने देखील घेतली. राजकारणासोबतच जनसेवेच्या कार्यात कधीही खंड पडू दिला नाही. रक्तदान शिबिरे, ब्लड बँकेची स्थापना, वारकरी संप्रदायाला अन्नदान या उपक्रमाबरोबरच ४२ हृदयरोग रुग्णांवर रुबी हॉल पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया तसेच १८०० रुग्णांवर जगप्रसिद्ध डॉ. दिक्षीत यांच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करून त्यांचे शारीरिक व्यंग दूर केले. राज्यपातळीवर महिलांना क्रिकेट खेळामध्ये प्रोत्साहन मिळावे म्हणून १९९८ साली राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन अकलूज व पुणे येथे त्यांनी केले होते.

एक राजकीय कारकीर्द म्हणून पाहिले तर खूप कमी कालावधीत पप्पासाहेबांचं नेतृत्व नावारूपाला आलं होतं. खास मित्र असलेल्या गोपीनाथजी मुंडे यांनी त्यांना भाजपच्या गोटात सामील करून घेतलं आणि विधानपरिषदेची उमेदवारी दिली. १९९८ साली भाजपकडून विधानपरिषदेवर महाराष्ट्रातून क्रमांक एकच्या मताने प्रतापसिंह आमदार झाले. कर्तुत्वाला योग्य न्याय देण्याचा भूमिकेतून त्यांची राज्य सहकार मंत्री पदी निवड झाली. त्यानंतर महाराष्ट्रात युती सरकार जाऊन आघाडी सरकार प्रस्थापित झाले. केंद्रातून सुशीलकुमार शिंदेंची महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदी वर्णी लागल्यानंतर सोलापूरात खासदारकीची पोटनिवडणुक जाहीर झाली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतापसिंह नावाच्या सिंहाने डरकाळी फोडली आणि निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. लोकप्रियतेच्या शिखरावर असणारे प्रतापसिंह तब्बल १,२२,८१७ मतांनी खासदार झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात या पोटनिवडणुकीच्या विजयाची नोंद झाली कारण, हा विजय ‘प्रतापसिंह मोहिते पाटील’ या नेतृत्वाचा होता. पुन्हा २००४ साली ते काँग्रेसकडून विधानपरिषदेवर गेले.

शंकर सहकारी कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. दरवर्षी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने घेतल्या जाणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्यातून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा निश्चित होत असे. शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नांची शासन दरबारी दखल घेतली जात असे. प्रत्येक तालुक्यातून पप्पासाहेबांवर प्रेम करणारी मंडळी या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र येत. ज्यांनी हे शेतकरी मेळावे पाहिले त्यांना प्रतापसिंह नावाची राजकीय श्रीमंती कळाली, साहेबांवर प्रेम करणारी माणसं उमगली. पप्पासाहेबांच्या तालमीत तयार झालेले कित्येक कार्यकर्ते आज जिल्ह्यात आमदार, झेडपी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. पप्पासाहेबांची छबी कायम रुबाबदार होती कारण, प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कुठेच कमी नव्हती. पप्पासाहेबांचा कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात वावरताना एक वेगळे वलय निर्माण होत असल्यामुळे अनेकांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा जनसेवेतूनच केला. पुढे अनेक राजकीय स्थित्यंतरातून त्यांना जावे लागले, परंतु जेवढी कारकीर्द त्यांना मिळाली त्याचे त्यांनी सोने केले.

पप्पासाहेब आज आपल्यात नाहीत, ही जिल्ह्यासाठी खूप मोठी पोकळी आहे. जिल्ह्याचा स्वाभिमान सदैव जागृत ठेवण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे चिरंजीव धवलसिंहाना मध्यंतरी करमाळ्यातील नरभक्षक बिबट्याला ठार केल्यानंतर पत्रकारांनी प्रश्न केला, आज पप्पासाहेब असते तर…. दुसऱ्या क्षणी धवलदादा म्हणाले, माझ्या आधी त्यांनीच तो बिबट्या टिपला असता ! धाडसाचे दुसरे नाव होते प्रतापसिंह. कोणतेही निर्णय ते धाडसाने घ्यायचे़, त्यांचे हे निर्णय राजकारणातील कोणत्याही नेत्याला लाजवेल असे होते. प्रतापसिंहांचा वारसा धवलदादा समर्थपणे पुढे नेताना दिसत आहेत. पदोपदी प्रतापसिंहाची उणीव त्यांना भासल्याशिवाय राहत नसली तरी पप्पासाहेबांनी आखून दिलेल्या वाटेवरूनच चालू असलेली त्यांची वाटचाल हेच खरे प्रतापसिंहाना जयंती निमित्ताने अभिवादन असेल.

आजही जेव्हा विचारतात की तुमचे पप्पासाहेब होते तरी कसे, तेव्हा मी सांगत असतो. वक्तृत्वाच्या युद्धामध्ये त्यांच्या शब्दांनाही धार होती अन् अन्यायाला छेदणारी लवलवती तलवार होती. दातृत्वाचा वसा उराशी, सोबती विकासाची कास होती, दिन दुबळ्यांच्या डोळ्यामधली ती ममतेची आस होती. मातृत्वाचे काळीज त्यांचे, बळीराजावर माया होती, काळ्या मातीत राबणारांची ती उन्हामधली छाया होती. विधायक कार्याला आक्रमकतेची जोड देणारे साहेब खरे लोकनेते होते.

आज जयंती दिनी स्वर्गीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांना विनम्र अभिवादन!

मयुर नवनाथ माने
उपसरपंच – ग्रामपंचायत गिरझणी

युवक सरचिटणीस – महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना

उपाध्यक्ष – युवक काॅग्रेस माळशिरस तालुका

मोबाईल नंबर – 9766261855

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना शिवसेना आमदार यांचं डोळ्यात अंजन घालणारं भावनिक पत्र…
Next articleनातेपुते नगरपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्रात “पुन्हा देवेंद्र” या फलकाने लक्ष वेधून घेतले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here