जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया त्वरीत सुरू करा अन्यथा १५ दिवसात राज्यव्यापी आंदोलन कोल्हापुरातून सुरू करण्याचा स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचा इशारा…

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे सौरभ शेट्टी यांनी निवेदन देऊन भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली.

पुणे ( बारामती झटका )

राज्यातील जिल्हा परिषदांची २०१९ पासून स्थगित असलेली भरतीप्रक्रिया सुरू करून, येत्या १५ दिवसांत परीक्षेची तारीख जाहीर करा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्याकडे स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्यावतीने सौरभ शेट्टी यांच्याकडून करण्यात आली. यावेळी कौस्तुभ हुलीकीरे, संकेत ठाकरे, विष्णुदास कोषकेवार, निलेश गायकवाड, महेश घरबुडे आदींसह स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदांमधील रिक्त असलेल्या पदांची जाहिरात मार्च २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार रिक्त असलेल्या १३,५२१ विविध पदांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भरतीप्रक्रिया लांबवली गेली. राज्यातील सरकारने कोरोनाच्या काळात आर्थिक अडचणीमुळे नोकरभरतीवर स्थगिती लावली. परंतु कोरोनाचा सामना करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्यातील पदे भरण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागांतील पाच प्रकारच्या पदभरतीसाठी मंजुरी देण्यात आली होती.

ही पदे आरोग्य पर्यवेक्षक, औषधनिर्माता, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) व प्रयोगशाळा तंत्रज्ञ याप्रमाणे होती. या पदांच्या परीक्षांचे नियोजन ऑगस्ट २०२१ मध्ये करण्यात आले होते. परंतु, दोन वेळा परीक्षांच्या तारखा जाहीर करून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मध्यंतरी या पदांची परीक्षा न्यासा कंपनी घेणार अशाही बातम्या समोर आल्या होत्या. परंतु MPSC समन्वय समितीने आरोग्य विभाग परीक्षेतील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर या भ्रष्टाचारात न्यासा कंपनीही सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या परीक्षांचे भविष्य अधांतरी लटकले आहे.

दरम्यानच्या काळात महाराष्ट्र शासनाने आधीच्या omr परीक्षेसाठी निवडलेल्या सर्व कंपन्यांचे कंत्राट काढून यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा IBPS, TCS आणि MKCL मार्फत घेण्याचा दि. १८ जानेवारी २०२२ च्या GR प्रसिद्ध केला आहे. अर्ज भरून तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला असून सरकारच्या तिजोरीत बेरोजगारांचे करोडो रुपये जमा आहेत. त्यामुळे यापुढे लवकरात लवकर जिल्हा परिषदांची भरती प्रक्रिया त्वरीत सुरू करा असे आवाहन सौरभ शेट्टी यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील १४३ विकास सेवा सोसायटीच्या निवडणूका सहाय्यक निबंधक संस्थेच्या आधिपत्याखाली पारदर्शक व सुरळीत सुरू.
Next articleसुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. संस्थान महाराज मानेवाडीकर सातारा यांचे सुश्राव्य किर्तन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here