१४ जून रोजी होणार सुनावणी
सोलापूर (बारामती झटका) संचार साभार
जिल्हा परिषदेच्या व पंचायत समिती निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर बुधवार अखेर ९५ जणांनी हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर येत्या १४ जून रोजी विभागीय आयुक्तांकडे सुनावणी घेण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे ७७ गट व ११ पंचायत समित्यांच्या १५४ गणांसाठी प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली होती. यावर ८ जून अखेरपर्यंत हरकती मागविल्या होत्या. बुधवारी शेवटच्या दिवसापर्यंत ९५ हरकती दाखल झाल्या आहेत.
पंढरपूर आणि अक्कलकोट मधून सर्वाधिक हरकती दाखल झाल्या आहेत. भौगोलिक रचनेनुसार प्रभाग रचना झाली नाही. कोणतीही सीमारेषा न ठेवता गावे जोडली आहेत. पूर्वी एका गणात असलेले गाव आता दुसऱ्या गणाला जोडले आहे. अशा स्वरूपाच्या हरकती आहेत. दाखल हरकती व सूचनांवर १४ जून रोजी सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सुनावणी घेण्यात येणार आहे.

तालुकानिहाय दाखल हरकती
करमाळा ८, माढा ७, बार्शी ६, उत्तर सोलापूर (निरंक), मोहोळ ११, पंढरपूर १५, माळशिरस २, सांगोला ११, मंगळवेढा ८, दक्षिण सोलापूर ९, अक्कलकोट १८
यांनी घेतल्या हरकती
अक्कलकोट तालुक्यातील माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी सभापती शिवानंद पाटील, माजी सदस्य उमेश पाटील, माळशिरस साठी माजी सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, माढ्यासाठी संजय कोकाटे, सांगोला बाळासाहेब ताटकर तर पंढरपूरमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, होटगीसाठी हरीश पाटील, पासल शेख, इंद्रजीत लोंढे यांनी हरकती घेतल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng