डाॅ.सुहास शेळके यांच्यावर निलंबनासाठी शहर भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
इंदापूर (बारामती झटका) शिवाजी पवार यांजकडून
इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात नागरिकांसाठी दि.०८/१०/२०२१ ते दि. १९/१०/२०२१ या कालावधीत लसीकरण मोहिम सुरू असून उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास शेळके हे शासकिय नियमांचे उल्लंघन करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ मदत करत आहेत. तरी डाॅ. सुहास शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, याकरिता राज्याचे माजी मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहर भाजपच्यावतीने तहसीलदार श्रीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
सदर निवेदनात असे म्हटले आहे की, इंदापूर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दि. ०८/१०/२०२१ ते दि. १९/१०/२०२१ या कालावधीत शहराच्या विविध भागात नागरिकांसाठी लसीकरण मोहिम सुरू करण्यात आलेली आहे. सोशल मिडिया व जाहिरातीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने याबाबत प्रसिध्दी केलेली आहे. तसेच यासाठी लस पुरवठा हा उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. वास्तविक पाहता गेल्या दीड वर्षामध्ये कोरोना काळात इंदापूर नगर परिषदेने कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वांना माहिती आहे. शहारातील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी देखील नगरपरिषदेच्या कामाचे कौतुक केले होते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात तालुका आढावा बैठकीत नगरपरिषदेने दत्तात्रय भरणे, प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या उपस्थितीत शहरात लसीकरण मोहिम राबवावी यासाठी नगरपरिषद सर्वोतपरी सहकार्य करेल अशी मागणी वारंवार करण्यात आलेली होती. परंतु यास केराची टोपली दाखवून उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुहास शेळके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहकार्य करत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच डॉ. सुहास शेळके उपजिल्हा रूग्णालय, इंदापूर हे कुठल्या ना कुठल्या कारणाने वादग्रस्त ठरलेले आहेत. सदर लसीकरण मोहिम उपजिल्हा रूग्णालय इंदापूर येथे किंवा शहारात नगरपरिषदेला विश्वासात घेवून राबविण्यात यावी. तसेच कोरोना लसीकरण मोहिमेबाबतीत शासकिय नियमांचे उल्लंघन करून सदर मोहिम राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ राबविण्यासाठी डॉ. सुहास शेळके यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
यावेळी शहर भाजपचे अध्यक्ष शकीलभाई सय्यद, नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, इंदापूर तालुका भाजपा ओबीसी मोर्चाचे पांडुरंग (तात्या )शिंदे, नगरपरिषदेचे गटनेते नगरसेवक कैलास कदम, नगरसेवक जगदीश मोहिते, माजी नगरसेवक गोरख शिंदे, सुनील आरगडे तसेच जावेद शेख, अभिजित अवघडे, सागर अरगडे, संदीप चव्हाण, असलम शेख, आबासाहेब थोरात, अक्षय राऊत, विकी खुडे, अशोक व्यवहारे आदी यावेळी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng