पंढरपूर (बारामती झटका)
अंबरनाथ येथील नौसेना सामग्री अनुसंधान प्रयोगशाळा (रक्षा अनुसंधान एवं विकास संघटन) चे डॉ. विजय निंबाळकर, वैज्ञानिक ‘डी’ यांचे ‘स्वेरी’तील विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी एकदिवसीय मार्गदर्शन सत्र आयोजित केले होते.
संपूर्ण जगाला कवेत घेण्याची क्षमता असलेल्या तंत्रशिक्षणातील विविध उपक्रमांतून नव्या दिशांचा शोध घेण्यासाठी स्वेरीचे अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर असते. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली व विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांच्या सहकार्याने हा उपक्रम संपन्न झाला.
कोरोना सारख्या जागतिक महामारीचा सामना करत असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडू नये यासाठी स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि.१६ ऑक्टोबर, २०२१ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत डॉ. विजय निंबाळकर यांचे ‘फ्लॅगशिप प्रोडक्ट्स फॉर नौसेना आणि रक्षा’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्र संपन्न झाले. संरक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना असलेल्या नोकरीच्या संधी व त्यासाठी घ्यावी लागणारी कठोर मेहनत या बाबींची डॉ.निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. पुढे बोलत असताना त्यांनी संरक्षण क्षेत्रांमधील असलेले अर्जुन ट्रक, मिसाईल्स (अग्नी,आकाश,पृथ्वी आणि ब्रह्मोस) इत्यादीचे गुणधर्म आणि रक्षा विभागासाठी या बाबींचा उपयोग यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सिस्टिम (रडार,सोनार) इत्यादींचे गुणधर्म आणि उपयोग सांगितले. समुद्रामधील जहाजे व पाणबुडया साठीचे वेल्डिंग तंत्रज्ञान याबद्दलची ही संपूर्ण माहिती सांगितली. विद्यार्थ्यांकडून भविष्यात पाणबुडया आणि जहाजातील विद्यमान बॅटरीज चार्जिंग करण्यासाठी सोलर बॅटरी विकसित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. स्वेरीमध्ये असलेल्या स्वयंपूर्ण अशा सोलर पावर प्लांट च्या माध्यमातून अभ्यास करून विद्यार्थ्यांनी सोलर बॅटरी निर्मितीचा अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले. डीआरडीओचे संरक्षण क्षेत्रामध्ये असलेले योगदान, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी उभारलेले ऑक्सीजन निर्मितीचे सुमारे ५०० प्रकल्प, आरोग्य यंत्रणेसाठी सॅनीटाईझर, मास्क इत्यादी स्वदेशी उपकरणांची करून दिलेली उपलब्धता याबाबत माहिती दिली. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रांमध्ये असलेल्या विविध संधी बाबत माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार डीआरडीओच्या प्रकल्पावर सुद्धा काम करता येऊ शकते, असे प्रतिपादन केले. एरोनॉटिकल सिस्टीम, नौसेनेसाठी लागणारे नौसेना एव्हिएशन सिस्टीम आणि मटेरियल्स, मायक्रो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस याबद्दलची उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली. पुढे त्यांनी डी. आर. डी.ओ. चे तंत्रज्ञान, थंड प्रदेशांमध्ये कार्यरत सैनिकांचे अन्नपदार्थ गरम ठेवण्यासाठीची यंत्रसामग्री याबाबत माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संशोधन व तंत्रज्ञान यावर विचारलेल्या प्रश्नांना शास्त्रज्ञ डॉ. निंबाळकर यांनी उत्तरे दिली. सूत्रसंचालन विद्यार्थी अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी केले तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकर यांनी आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng