माळशिरस (बारामती झटका)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द आणि शिवराळ भाषा वापरल्या प्रकरणी माळशिरस येथील अतिरिक्त सत्र व जिल्हा न्यायाधीश श्री. एम. एन. पाटील यांनी आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे पिराळे ता. माळशिरस येथील व्हॉट्स ॲप ग्रुपवर दि. 21/04/2022 रोजी 7 मिनिटे 58 सेकंदाची आरोपीचे संभाषण असलेली ऑडियो रेकॉर्डिंग क्लिप व्हायरल झाली होती. त्यामध्ये आरोपीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द आणि शिवराळ भाषा वापरल्याबाबतची फिर्याद पिराळे येथील श्री. प्रमोद शिंदे यांनी नातेपुते पोलिस ठाण्यात केली होती. नातेपुते पोलिसांनी आरोपीस अटक करून मे. कोर्टात हजर केल्यावर आरोपीने नियमित जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपी तर्फे तो मनोविकृत असलेबाबत तसेच सदर गुन्ह्यात अट्रोसिटी कायदा लागू होत नसल्याचा बचाव घेण्यात आला होता. आणि सदर गुन्हा सार्वजनिक ठिकाणी नसल्याचे सांगितले. त्यास सरकारी वकील यांनी विरोध करत गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून तपास पुर्ण झाला नसल्याने अर्ज ना मंजूर करण्याची विनंती केली. मूळ फिर्यादी तर्फे ॲड. सुमित सावंत यांनी आरोपी मनोरुग्ण नसल्याचे आणि सदर गुन्हात अट्रोसिटी लागू होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर युक्तिवाद गृहीत धरून मे. कोर्टाने आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.
या केसमध्ये सरकारी वकील म्हणुन ॲड. संग्राम पाटील यांनी काम पाहिले. तर फिर्यादी तर्फे ॲड. सुमित सावंत यांनी काम पाहिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng