निमगाव (म.) (बारामती झटका)
निमगाव (म.) येथील जिल्हा परिषद शिक्षक डॉ. राजेंद्र मगर यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समिती, तरवडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर यांच्यावतीने दिला जाणारा राज्यस्तरीय “विशेष साहित्य पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. सत्यशोधक मुकुंदराव पाटील यांनी तरवडी खेडेगावातून दीनमित्र नावाचे सत्यशोधकीय वृत्तपत्र स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक वर्षे चालवले होते. त्याचा वारसा पुढे चालवत त्यांच्या वारसदारांनी ‘दीनमित्र साहित्य पुरस्कार’ देण्याची परंपरा 1995 पासून सुरू केली. सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या साहित्याला गेली 21 वर्षे पुरस्कार दिले जातात. या वर्षीचा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार डॉ. मगर लिखित ‘महानायक गंगारामभाऊ म्हस्के’ या चरित्राला जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील गंगारामभाऊ म्हस्के (1831-1901) यांनी पुणे येथे येऊन महात्मा जोतीराव फुले, न्यायमूर्ती रानडे यांच्या सोबतीने सामाजिक सुधारणेसाठी प्रचंड काम केले. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पुण्यातील लष्करी भागात शाळा, धर्मशाळा आणि ग्रंथालये उभारली. शिष्यवृत्ती देण्यासाठी ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’ नावाची संस्था उभारली. त्यामाध्यमातून खेड्यापाड्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, शाहू महाराजांच्या प्रशासनातील पहिले बहुजन अधिकारी भास्करराव जाधव, इंजिनिअर दाजीराव विचारे आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार अशा महत्त्वाच्या व्यक्तींना म्हस्के यांनी शिष्यवृत्ती दिली होती. बडोद्याचे सयाजीराव महाराज त्यांना शिष्यवृत्तीसाठी मुबलक निधी देत. त्याचबरोबर इतर संस्थानिकांकडून ते निधी जमा करत आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत. बहुजन वर्गातील लोकांच्या उन्नतीसाठी आयुष्यभर परिश्रम घेणाऱ्या म्हस्के यांच्याविषयी जनमानसात अत्यल्प माहिती होती. डॉ. मगर यांनी 120 वर्षांपूर्वीची वस्तुनिष्ठ आणि दुर्मिळ माहिती चरित्रातून समोर आणली. त्यांनी लिहिलेल्या सत्यनिष्ठ चरित्राला पुरस्कार जाहीर करण्यात आला.
येत्या 19 डिसेंबर रोजी पुरस्काराचे वितरण दीनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या तरवडी गावी महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते केले जाणार आहे. समारंभाचे अध्यक्ष मा. आमदार नरेंद्र घुले पाटील आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. आमदार पांडुरंग अभंग आणि सचिव उत्तमराव पाटील यांनी दिली.
पुरस्काराबद्दल ज्येष्ठ लेखक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा भांड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यासक्रम मंडळाचे अध्यक्ष शिरीष लांडगे, भिगवण कॉलेजचे प्राचार्य महादेव वाळुंज आणि माळशिरसचे गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng