करमाळा (बारामती झटका)
तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोचवण्याचे काम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून याच्या माध्यमातून शासनाच्या सर्व आरोग्य संदर्भातील योजना जनतेपर्यंत पोचल्या पाहिजेत, असे मत तहसीलदार समीर माने यांनी व्यक्त केले. शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्यावतीने करमाळा शहरात दोन दिवसीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात रुग्णांची सर्व प्रकारची तपासणी करून मोफत चष्मे वाटप, मोफत औषधे वाटप, मोफत ईसीजी तपासणी याशिवाय आवश्यक असलेल्या सर्जरीची मोफत सोय करून देण्याची जबाबदारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने पार पाडल्या जात आहेत. आजच्या या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते झाले. यानंतर बोलताना समीर माने म्हणाले की, डोळे तपासून चष्मा घेण्यासाठी एका रुग्णाला किमान एक हजार रुपये खर्च येतो. पण आज याठिकाणी मोफत चष्मे वाटप होत आहेत. शिवाय सर्व प्रकारच्या आजारावर औषधे सुद्धा मोफत दिली जात आहेत. हृदयशस्त्रक्रिया याची ज्यांना आवश्यकता असेल त्यांना शासकीय योजनेतून मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्याची सुविधा सोय या शिबिरात करून देण्यात आली आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असून हे उपक्रम ग्रामीण भागात गावागावात राबवले पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पक्षप्रमुख मंगेश चिवटे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात गेली तीन वर्षापासून सुरू आहे. या माध्यमातून आत्तापर्यंत महाराष्ट्रात जवळपास दोन लाख रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत. शिवाय अत्याधुनिक 140 रुग्णवाहिका महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
शिवाय गरजू रुग्णांना महागड्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत केली जाते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे विशाल गायकवाड, शिवसेना नेते पैलवान राहुल कानगुडे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपक पाटणे, शिवसेना सोशल मीडियाचे करमाळा प्रमुख निलेश राठोड, महिला आघाडीच्या प्रियंका ताई गायकवाड, तालुका समन्वयक शंभूराजे फरतडे, मार्केट कमिटीचे माजी संचालक देवानंद बागल, काँग्रेस आयचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बापू सावंत, अर्बन बँकेचे माजी संचालक फारूक जमादार, प्रमोद भाग्यवंत, जयवंतराव जगताप युवा मंचाचे अध्यक्ष जयराज उर्फ सोनू चिवटे, शिवसेनेचे कॉन्ट्रॅक्टर अनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

आज पहिल्या दिवशी 340 रुग्णांनी नोंदणी केली असून उद्या मंगळवारी किमान एक हजार रुग्ण तपासणी करून मोफत चष्म्याचा लाभ घेतील, असा विश्वास शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष करमाळा शाखेच्या वतीने व्यक्त करण्यात आलेला आहे.
मंगळवारी 19 एप्रिल रोजी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर उद्या दुपारी ३ वाजता करमाळा येथे या शिबिराचा समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, अशी विनंती शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng