परभणी (बारामती झटका)
देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या राजकारणासाठी सोयीच्या अशा बातम्या येत नसतील, त्यामुळे ते पवारांचा सहारा घेत आहेत. बिचाऱ्या देवेंद्रजींना पक्षात कोणी जास्त हलायला जागा देत नसल्याने पवारांविषयी वावड्या उठवल्या जात असाव्यात, अशी शक्यता आहे. आज त्यांच्याकडे गृहमंत्री, अर्थमंत्री, वीज खाते, अजून किती खाती आहेत कोण जाणे. एकाच माणसाकडे एवढी खाते आहेत, त्याने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. परंतु, अभ्यासात लक्ष नसलेल्या आणि वर्गात बसून खिडकीतून बाहेर लक्ष देत उनाडक्या करणाऱ्या मुलासारखी देवेंद्र फडणवीस यांची स्थिती झाली आहे, अशी टीका खा. सुप्रियाताई सुळे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे मंगळवारी एका लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी आल्या असता राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकारांशी त्या बोलत होत्या.
पहाटेच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल त्या म्हणाल्या, खरे तर देवेंद्रजी हे सुसंस्कृत राजकारणी आहेत, असे समजत होते. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. ते विकासासाठी सुसंस्कृत आहेत. परंतु, आज विकास सोडून राज्यात सर्व काही चालते आहे. देवेंद्रजी काहीही बोलतात. आपण एका राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत, हे ते विसरले असतील. एखाद्या विरोधी पक्षातील नेत्याप्रमाणे त्यांची विधाने यायला लागली आहेत, असा आरोप खा. सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. राज्य सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, राज्यातील ईडी अर्थात एकनाथ आणि देवेंद्रजी यांच्या सरकारचे कार्य काय आहे तर राज्य सरकारने केलेले काम म्हणजे आपल्या राज्यातील सर्व प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवणे, महागाई वाढवणे, स्वतःच्या प्रसिद्धीवर लाखो कोट्यावधी रुपयांचा चुराडा करणे, हेच महाराष्ट्रातील सरकार करत आहे. गेली काही दिवस एवढेच चालले आहे, असा गंभीर आरोप खा. सुप्रियाताई सुळे यांनी केला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng