बारामती ( बारामती झटका )

आज पहाटे जिमला जाण्यासाठी निघालो होतो. पहाटे साडेपाच वाजता बारामती पंचायत समितीच्या समोर काही माणसं हातात फाईल घेऊन थांबली होती. आधी व्यायामला जाणारी माणसं असावीत असं वाटलं, पण नीट पाहिलं तर इनशर्ट करून ही माणसं तिथं काही तरी इशारे करत होती. गाडी वळवून माघारी आलो गाडीच्या उजेडात पाहिलं तर ते बांधकाम खात्याचे, आणि पंचायत समितीचे अधिकारी होते. मी विचारलं आज इतक्या लवकर… त्यावर एकजण उत्तरले, अहो साहेब, दादा आहेत, आज पाऊणे सहाला येणार आहेत. मी हसलो आणि म्हटलं चला good day…
खरं तर मी आज पर्यंत कोणत्याही पक्षाचं कौतुक केलेलं नाही आणि करत नाही. पण, राजकारणात काही माणसं आपल्या वेगळेपणाची छाप उमटवतात त्यातलेच एक अजितदादा पवार…
अजितदादा पवार हे व्यक्तिमत्व राज्यात अनेक विषयांनी चर्चेत असतं. कधी त्यांचं बोलणं, कधी डायलॉग, तर कधी एखादं “दम”दार भाषण… आणि ते नेहमी चर्चेत असतात ते म्हणजे त्यांच्या कामं करण्याच्या पद्धतीमुळे… अजितदादा बारामतीत आहेत म्हटलं की, बारामतीचे महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, जवळपास सगळ्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदल्या दिवशीच आपापल्या कामाचा अहवाल, अजितदादांनी गेल्यावेळेस कोणत कामं सांगितलं आहे, त्याची पूर्तता झालीय का, त्याबाबत तपशील, सगळ्या गोष्टी तयार ठेवून सर्व अधिकारी एकतर आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा… अजितदादा यांच्या निवासस्थानी हजर असतात.
खरं तर, अजितदादा ज्यावेळी बारामतीमध्ये हजर असतात तेव्हा हे चित्र सर्रास पाहायला मिळतं.
माझाही लिहिण्याचा अट्टहास एवढाच की, शेवटी प्रत्येक माणूस हा स्वतःसाठी चांगला असतो. प्रत्येकाची मनं जपणं कोणत्याही माणसाला शक्य नसतं. त्यामुळे जो माणूस स्वतःचा जीव ओतून कामं करतो. स्वतःला शिस्त लावून घेतो अर्थात तेव्हा त्याच्या कुटुंबाला आणि जरा नेता असेल तर त्याच्या तालुक्याला ही तशीच शिस्त लागते. म्हणूनच, अजितदादा यांची भल्या पहाटे उठून कामं करण्याची पद्धत आपल्याला बरंच काही शिकवून जाते. शेवटी प्रत्येक माणसाकडे काही गुण-अवगुण असतात. पण आपण त्यांचे सद्गुण आत्मसात करून अवगुणांकडे दुर्लक्ष केलं तर, तुम्हाला भेटलेला प्रत्येक माणूस चांगला दिसेल. फक्त तुमची दृष्टी कशी आहे हे फार महत्वाचं आहे.
खरं तर अजितदादा पवार हा मनुष्य त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात आणि राजकारणात कसे आहेत हे मला माहिती नाही आणि मला त्यात पडायचं ही नाही. परंतू त्यांच्या कामं करण्याच्या पद्धतीने मी स्वतः प्रभावित आहे. शेवटी प्रशासनावर लोकप्रतिनिधीचा जरब असणं किती महत्वाचं असतं हे बारामती सोडून इतर ठिकाणी गेल्यावर समजतं. पण अर्थात या जरबेचा राजकीय गैरफायदाही होऊ नये इतकंच.
हा लेख वाचल्यानंतर अनेकांना मी कोणाला तरी फॉर आहे किंवा कोणाच्या तरी बाजूने लिहतोय असा ही अर्थ काढला जाईल. पण शेवटी मला जे वाटतं ते मी लिहितो आणि बोलतो सुद्धा मग ते चांगलं असो किंवा चुकीचं. पण चांगल्याला चांगल आणि चुकीला चूक म्हणून व्यक्त होण्याची क्षमता आहे म्हणून लिहितोय.
अजितदादा पवार यांच्या या कार्यपद्धतीचं किमान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तरी अनुकरण करावं एवढीच अपेक्षा.
मच्छिन्द्र टिंगरे – बारामती मो. 9527547547
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng