कर्मचाऱ्यांच्या निर्णयामुळे आदिनाथ कारखाना सुरू होण्याच्या मार्गातील मोठा अडसर दूर
पण झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण ? सभासदांचा प्रश्न
करमाळा (बारामती झटका)
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे गोडाऊन मधील साखर विक्री करण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी सातत्याने आडकाठी आणल्यामुळे कारखान्यावर 30 ते 35 कोटी रुपये व्याजाचा बोजा वाढला आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता ऊस उत्पादक सभासद विचारत असून कारखान्याला आलेल्या जप्तीच्या वाईट प्रसंगाला सुद्धा काही कर्मचारी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. मात्र, आता बदलत्या परिस्थितीत आदिनाथ कारखान्याचे हित जपणाऱ्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी भूमिका बदलून कारखाना सहकारी तत्त्वावर चालवण्यासाठी पुढाकार घेत दोन पावले मागे घेऊन तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यास मान्यता दिली आहे
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे गोडाउन मध्ये सध्या २ लाख ३० हजार पोती साखर शिल्लक असून याची किंमत ६५ कोटी रुपये आहे. या प्रत्येक पोत्यामागे १५० रुपये प्रमाणे कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी रक्कम देण्याची भूमिका राज्य शिखर बँकेची आहे. या प्रस्तावानुसार जवळपास साडेतीन कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी उपलब्ध होत असून कर्मचाऱ्यांचे किमान तीन पगार होतील, अशी अपेक्षा आहेत. या साखर विक्रीतून जवळपास साठ लाख रुपये राज्य सहकारी बँकेच्या कर्ज खात्यात जमा झाल्यानंतर रिझर्व बँकेच्या कायद्यानुसार आपोआपच सरफेसी म्हणजे जप्तीची कारवाई रद्द होणार आहे. आदिनाथ कारखाना भाडेकरारावर गेला तर सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या संपुष्टात येऊन सभासदांचे ही अस्तित्व धोक्यात येणार आहे. बारामती ॲग्रोशी केलेल्या कराराप्रमाणे दरवर्षी दोन कोटी रुपये वार्षिक भाडे व प्रति टन गाळप ऊसावर प्रत्येकी शंभर रुपये असे केवळ सहा ते सात कोटी रुपयांचे उत्पन्न आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांना मिळणार आहे
शिवाय ही सात कोटी रुपयांची दरवर्षी भाड्यापोटी मिळणारी रक्कम चार टप्प्यात विभागून देण्याची सवलत बारामती ॲग्रोकडून देण्यात आली आहे. यामुळे आदिनाथ कारखान्यांना दरवर्षी मिळालेले भाडे राज्य शिखर बँक व दिल्लीच्या एन सी डी सी बँक यांचे व्याज व इतर देणी देण्यातच जाणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे हा कारखाना बारामती ॲग्रोचाच मालकीचा होणार अशी भीती निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी सुद्धा त्यागाची भूमिका घेऊन कारखाना वाचविण्यासाठी पुढे येत आहेत. – बापू तळेकर, अध्यक्ष, आदिनाथ कर्मचारी महासंघ
आम्ही १५ ते २० कर्मचाऱ्यांची शिष्टमंडळ घेऊन लवकरच राज्य शिखर बँकेचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साखर गोडाऊन मधून बाहेर काढून विक्री करण्यास मान्यता देणार आहोत. शिल्लक साखरेवरील प्रत्येक पोत्यामागे एकशे पन्नास रुपये कर्मचारी पगारासाठी बँकेने राखीव ठेवण्याचे मान्य केले आहे. यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांचे ३ पगारी होतील असा आशावाद आहे. आमच्याबरोबर सुमारे ३०० कर्मचारी असून जे कर्मचारी या प्रस्तावाला विरोध करतील त्यांचा व आमचा काही संबंध नाही. – हरी शिंदे, कर्मचारी आदिनाथ सहकारी साखर कारखाना
आदिनाथ साखरी साखर कारखाना ही आमच्या स्वाभिमानाची लढाई असून हा कारखाना वाचण्यासाठी व सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी कर्मचारी कटिबद्ध असून हा कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी बचाव समितीने ठोस पावले उचलावीत यात कोणीही आता राजकारण आणू नये. – अण्णा सुपनर, अध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना
आदिनाथ कारखान्याचे कर्मचारी यांनी घेतलेली भूमिका अत्यंत स्वागतार्ह असून या भूमिकेचे बळीराजा शेतकरी संघटना स्वागत करीत असून आदिनाथ कारखानाही करमाळा चा स्वाभीमान असून हा दुसऱ्याच्या घशात जाता कामा नये. हा कारखाना गिळंकृत करण्यासाठी अनेक कावळे टपून बसले आहेत मात्र, बळीराजा संघटना हा त्यांचा हेतू साध्य होऊ देणार नाही.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng