देवडी येथील सोहम तळेकर याचे “नीट” च्या परीक्षेत उज्ज्वल यश

720 पैकी 632 गुण प्राप्त करीत कॉलेजमध्ये पटकावला प्रथम क्रमांक

माढा (बारामती झटका)

बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व मोहोळ तालुक्यातील देवडी येथील रहिवासी सोहम शिवाजी तळेकर याने जुलै 2022 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात “नीट” च्या परीक्षेत 720 पैकी 632 गुण प्राप्त करीत उज्वल यश संपादित करुन कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सोहम तळेकर यांचे माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय देवडी येथे झाले असून त्याने दहावी मध्ये 94.8% तर बारावी बोर्डाच्या परीक्षेत 88.33% गुण मिळवून कॉलेजमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता. याकरिता त्याला प्राचार्य अंकुश पांचाळ, प्रा. संजीव सोनवणे, प्रा. शशिकांत तरटे, प्रा. पियुष पाटील, प्रा. विक्रम पवार, प्रा. सुशील अबंदे, प्रा. सलमान सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.

देवडीसारख्या एका छोट्या गावातील विद्यार्थ्यांने कोरोनाच्या संकटाच्या काळातही प्रयत्न, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ऑनलाईन व ऑफलाईन तासिकाद्वारे अभ्यास करीत हे उत्तुंग यश मिळवले आहे. विशेष बाब म्हणजे त्याने कोठेही खाजगी शिकवणी लावली नव्हती. देवडी येथील महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी तळेकर यांचा मुलगा व माढा तालुक्यातील विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू गुंड यांचा नातू आणि आदर्श शिक्षक तथा पत्रकार राजेंद्र गुंड सर व प्राथमिक शिक्षक सुधीर गुंड यांचा तो भाचा आहे.

या यशाबद्दल त्याचे अभिनंदन देवडी येथील संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी केले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी “नीट” च्या परीक्षेला न घाबरता किंवा त्याचा अधिक बाऊ न करता सातत्यपूर्ण अभ्यास व सराव परीक्षांच्या माध्यमातून आत्मविश्वास पूर्वक तयारी केली तर हमखास यश प्राप्त करता येते. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतो की, या परीक्षेत इंग्रजी माध्यमाचे किंवा सीबीएससी बोर्डाचेच विद्यार्थी यशस्वी होतात परंतु, असे काही नाही. मी स्वतः दहावीपर्यंत पुणे बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या विद्यालयात शिकून हे यश प्रयत्नपूर्वक आणि कॉलेजमधील शिक्षकांच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर संपादित केले आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अनावश्यक वापर, कौटुंबिक जिव्हाळा, सण-समारंभ, मित्रमंडळी सोबत नाहक हिंडणे-फिरणे आदी बाबींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया सोहम तळेकर याने दिली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वाभिमानीची २१ वी ऊस परिषद १५ ऑक्टोबर रोजी जयसिंगपुरात होणार – राजू शेट्टी
Next articleसदाशिवनगर येथील सुप्रसिद्ध व्यापारी जंबुकुमार दोशी यांचे नातू चि. संयम याचे रत्नत्रयचे तीन उपवास पूर्ण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here