देव आहे का नाही माहित नाही, मात्र माणसातील देव माणूस पाहायला मिळाला – श्रीमती शोभाताई खोले.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यामुळे पतीला पुनर्जन्म मिळाला – सौ. रेखाताई खोले.

नातेपुते ( बारामती झटका )

समाजामध्ये वावरत असताना अनेक लोकांचा देवावर विश्वास असतो देव आहे का नाही, माहित नाही. मात्र माणसातील देव माणूस आमदार राम सातपुते यांच्या रूपाने पहायला मिळाला असल्याचे भावनिक मत पिंटू खोले यांच्या मातोश्री श्रीमती शोभाताई खोले यांनी सांगितले. तर माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्यामुळे माझ्या पतीला पुनर्जन्म मिळाला, असे आत्मविश्वासाने सौ रेखाताई खोले यांनी सांगितले.

नातेपुते शहरात खोले परिवार आहे. त्यांचा उदरनिर्वाह पेपर एजन्सी वाल्यांचे पेपर घरोघरी जाऊन वितरण करण्याचा आहे. पिंटू खोले यांचे वडील कमलाकर खोले यांनीही घरोघरी पेपर वाटण्याचे काम केलेले होते. त्यांना मदत शोभाताई खोले करीत असत. पिंटू खोले यांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता, त्यावेळेस वडील कमलाकर यांचे दुःखद निधन झालेले होते. शोभाताई खोले यांनी अतिशय दुःखाच्या प्रसंगामध्ये धैर्याने व धिराने आपले जीवन जगलेल्या आहेत. पिंटूचा जन्म झाल्यानंतर मातृत्व आणि पितृत्वाची जबाबदारी शोभाताई सांभाळत असत. पेपर वितरणाचा व्यवसायावर त्यांचा प्रपंच चालत असे. पहाटे उठून थंडी पाऊस असला तरी दररोज पेपर वाटण्याचे काम सुरू होते.

पिंटू मोठा झाल्यानंतर पेपर वाटण्याचे काम सुरू केले‌. पेपर वाटल्यानंतर गणेश फुट वेअर घुले यांच्या चप्पलच्या दुकानात दिवसभर पिंटू काम करीत असत. दिवसेंदिवस माय लेकरांचा प्रपंचामध्ये सुधारणा होत चाललेली होती. पिंटूचा विवाह रेखाताई यांच्याशी झालेला आहे. घरामध्ये तीन व्यक्ती गुण्या गोविंदाने नांदत होते. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावर शोभाताई खोले यांची श्रद्धा आहे. भक्ती भावाने गोंदवलेकर महाराजांची सेवा सुरू आहे. घरातील मुलगा व सून हे सुद्धा गोंदवलेकर महाराजांची पूजा अर्चा करीत असतात. पिंटू पेपर वाटून चप्पलच्या दुकानात काम करीत आहे. नातेपुते येथील सुप्रसिद्ध उद्योजक शशीभैया मलकाप्पा कल्याणी यांच्या साडी सेंटर मध्ये रेखाताई दररोज कामाला जात आहे.

घरची खोले यांची गरीब परिस्थिती मात्र मनाची श्रीमंती. कष्टमय जीवन ते स्वाभिमानाने जगत होते. अचानक खोले परिवार यांच्यावर आभाळ कोसळावे असे संकट आले. पिंटू यांना वयाच्या 32 व्या वर्षी अचानक फिटचा त्रास झाल्यामुळे अकलूज येथील हॉस्पिटलमध्ये 21 एप्रिल 2022 रोजी ॲडमिट करावे लागले. एम आर आय केल्यानंतर ब्रेन ट्यूमर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अकलूजच्या डॉक्टरने पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगितले. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ऑपरेशनचा खर्च अडीच लाख रुपये, मेडिकल व इतर खर्च वेगळा असे सांगितल्यानंतर पाया खालची वाळू सरकावी अशी अवस्था खोले परिवार यांची झाली होती.

दररोज काम करून दैनंदिन खर्च भागत होता. शिल्लक मात्र काही नव्हते. ब्रेन ट्यूनरच्या ऑपरेशनसाठी पैसे आणायचे कोठून असा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादाने शशीभैया कल्याणी यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याशी संपर्क करून पिंटू खोले यांची परिस्थिती आमदार राम सातपुते यांच्या कानावर घातल्यानंतर आ. राम सातपुते यांनी क्षणाचाही विलंब न करता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क केला आणि पिंटू खोले यांना ॲडमिट होण्यास सांगितले.

14 जुलै 2022 रोजी दिनानाथ मंगेशकर येथे पिंटू खोले यांच्या ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन मोफत करण्यात आले. ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर खोले परिवाराने सुटकेचा निःश्वास टाकलेला आहे. त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्यामुळे माझ्या पतीला जीवदान मिळाले, खरंच गोरगरिबांची जाणीव असलेले लोकप्रतिनिधी आहेत. अनेक लोकांनी मदतीची भावना व्यक्त केली. परंतु कोणीही वेळेला उपयोगी आले नाही. गोंदवलेकर महाराज यांच्या रूपाने शशीभैया कल्याणी यांनी लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्याशी संपर्क करून आमचे ऑपरेशन मोफत करून पुनर्जन्म मिळालेला आहे. आमच्यासाठी आमदार राम सातपुते देव माणूस भेटलेले आहेत. त्यांनी केलेल्या मदतीचा व सहकार्याचा कदापि विसर पडणार नाही, कायम आमदाराचे कार्य स्मरणात राहील, असे काम केलेले आहे, अशी खोले परिवाराने भावना व्यक्त केली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleचांडाळ चौकडी फेम भरत महाराज शिंदे उर्फ बाळासाहेब यांचे सुश्राव्य कीर्तन होणार…
Next articleआमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here