महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस सत्तेत मात्र, नातेपुते नगरपंचायतमध्ये सत्तेच्या बाहेर तिन्ही पक्षाची वाताहत…
नातेपुते ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाचे राजकीय नाक समजली जाणारी नातेपुते नगरपंचायत. या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचा एकही नगरसेवक नसल्याने नगरपंचायतमध्ये काय चाललंय ? हे पहायलासुद्धा एक नगरसेवक नसणे राष्ट्रवादीचे दुर्दैव आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस आय तिन्ही पक्ष सत्तेत आहेत. मात्र, नातेपुते नगरपंचायतमध्ये सत्तेच्या बाहेर तिनही पक्षाची वाताहत झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.
नातेपुते नगरपंचायत निवडणुकीत जनशक्ती आघाडी अकरा नगरसेवक व नागरी आघाडी पाच नगरसेवक व अपक्ष एक नगरसेवक असे अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत. निवडून आलेले उमेदवार मोहिते पाटील गटाचे व भारतीय जनता पार्टी विचाराचे आहेत. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक गट महाराष्ट्र विकास आघाडी व राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यासोबत गेलेला होता. तर दुसरा गट जनशक्ती आघाडी सोबत होता. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीच्या विचाराचे उमेदवार यांचा दारूण पराभव झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर उमेदवार उभे केले असते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरपंचायत मध्ये दिसला असता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्या नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म न देता कोणाच्या तरी दावणीला आमिषाला बळी पडून राजकीय पोळी भाजण्याच्या उद्देशाने केलेले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली आहे. त्यामुळे भविष्यात माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक कमी होऊन भाजपचे कमळ फुलणार असल्याचे नगरपंचायत निवडणुकीवरून राजकीय विश्लेषक अंदाज बांधत आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng