आदेश न ऐकणार्या आयुक्तांबाबत अजितदादा पवार यांची नाराजी
मुंबई (बारामती झटका)
‘अजितदादा पवारांनी सांगितले तरी मी निधी देणार नाही’, असे राज्याची मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी म्हटल्याचा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. अशा अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपचे आशिष शेलार यांनी केली आहे. त्यावर, ‘निधी देण्याबाबत मी शांतपणे त्या अधिकार्यास समजावून सांगतो आणि नाहीच ऐकले तर सक्तीच्या रजेवर पाठवतो. तसेच सरकारच्यावतीने निधीही दिला जाईल’, या शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभागृहाला आश्वस्त केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील साखरीआगर (ता. गुहागर) येथील मच्छीमारांसाठी मूलभूत सुविधा व जेटी उभारण्याबाबत भास्कर जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या कामासाठी 8 कोटी 46 लाख रुपये खर्च येणार असून तो जिल्हा नियोजन समितीतून केला जाईल. या मत्स्यव्यवसाय मंत्री असलम शेख यांच्या उत्तरावर समाधान न झालेले भास्कर जाधव यांनी डीपीसीतून निधी देणार, हे मंत्री कोणत्या अधिकारात सांगत आहेत, असा सवाल करून खात्यामार्फत निधी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांचा मंत्री शेख यांच्यावर जोरदार भडीमार सुरू असताना उपमुख्यमंत्री पवार सभागृहात आले. ‘मी माझ्या दालनात असलम शेख, अनिल परब, भास्कर जाधव आणि संबंधितांची बैठक घेतो. आयुक्त ऐकत नसतील तर त्यांना शांतपणे सांगतो अन तरीही ऐकले नाही तर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवतो. कुठून मिळाला नाही तरी सरकार या कामांसाठी नक्कीच निधी देईल, असे पवार यांनी सांगितल्यानंतर सभागृहाचे समाधान झाले
दोन महिन्यांवरून आले सात दिवसांवर
‘अजितदादा पवार यांनी सांगितले तरी मी निधी देणार नाही’ या मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्या विधानाची चौकशी दोन महिन्यात केली जाईल, असे आश्वासन मंत्री असलम शेख यांनी दिले. पण दोन्ही बाजूच्या सदस्यांनी दोन महिने कशाला, असा घोषा लावला. त्यावर त्यांनी पंधरा दिवसात चौकशीचे आश्वासन दिले तरीही सदस्यांचे समाधान न झाल्याने अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांच्या आत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng