नातेपुते येथे दुसऱ्या राज्यस्तरीय महाअधिवेशनचे आयोजन
नातेपुते (बारामती झटका)
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय दुसऱ्या महाअधिवेशनचे आयोजन नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालय येथे दि. ७ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येणार आहे. या महा अधिवेशनाला अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस ही संघटना अराजकीय, धर्मनिरपेक्ष सामाजिक संघटना असून दलित आदिवासी मानवाधिकार कार्यकर्ते, अत्याचार पीडित, शिक्षणतज्ञ व कायदे तज्ञ यांची सामाजिक चळवळ आहे. समता व बंधुता अबाधित राहण्याकरिता जातिभेद व मुख्यत्वे अस्पृश्यता निवारणावर व त्यावर आधारित हिंसा व अत्याचाराशी संबंधित विषयावर कायदेशीररित्या काम करून सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराची पाठराखण करून अनुसूचित जाती व जमाती समुदायाला न्याय देण्याचे प्रयत्न करते ही संघटना महाराष्ट्रासह भारतातील १८ राज्यात कार्यरत आहे.
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस च्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील 25 वर्षांपासून ॲट्रॉसिटी कायदा आणि अनुसूचित जाती जमातींच्या अधिकारावर विविध उपक्रम, लॉंगमार्च, कार्यशाळा, परिषदा इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून चैतन्य मंगल कार्यालय, दहिगाव रोड, काळे पेट्रोल पंपासमोर, नातेपुते ता माळशिरस, जि. सोलापूर येथे दि. ७ जानेवारी २०२२ रोजी राज्यस्तरीय दुसरे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या महामेळाव्यात संपूर्ण देशातून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, न्यायालयीन, उद्योजकता, कला, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील दिग्गज पुढारी व मान्यवर यांच्यासह जवळपास २००० सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. या महाअधिवेशनाचे आयोजन राज्य महासचिव ॲड. डॉ. केवल उके, राज्य सचिव वैभव गिते, राज्य सहसचिव पी. एस. खंडारे आणि राज्य प्रसिद्धीप्रमुख प्रमोद शिंदे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng