माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीतील रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचे निवेदन माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांना आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आले. यावेळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, संघटन सरचिटणीस संजय देशमुख, रिपाईचे माजी तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले, तालुका उपाध्यक्ष पिनू माने, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, चिटणीस हनुमान कर्चे, युवा मोर्चाचे सरचिटणीस युवराज वाघमोडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष महादेव ठवरे, किसान मोर्चा उपाध्यक्ष अविनाश ठवरे, ओबीसीचे तालुका उपाध्यक्ष दत्ता कर्चे, शांतीलाल तरंगे आदी उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विकास कामाबाबत एक नंबरवरती असलेली माळशिरस पंचायत समिती लोकनियुक्त प्रतिनिधी यांची मुदत संपल्याने पंचायत समितीचा गाडा प्रशासनावरती चालू आहे. याचा गैरफायदा प्रशासनातील काही अधिकारी याचा घेत आहेत. त्यामध्ये रोजगार हमी योजनेकडील एनजीओ मार्फत नियुक्त असलेले अधिकारी एस. एन. सरगर हे सध्या पंचायत समितीत माझ्याशिवाय काहीच चालत नाही, अशा अविर्भावात वागत आहेत.

त्यांच्याकडे रोजगार हमी विकास योजनेमध्ये अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या निगडित योजना आहेत. त्यामध्ये गाय गोठा, अहिल्या सिंचन विहीर योजना, तुती लागवड यासारख्या अनेक योजना शेतकऱ्यांशी निगडित आहेत. त्यामध्ये विशेष करून विहीर योजनेमध्ये लाभार्थी मस्टर जमा करतेवेळी ७०० रुपये व नवीन मस्टर करतेवेळी ५०० रुपये अशी चिरीमिरी घेतल्याशिवाय एक पानही हलवत नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी पंचायत समितीमध्ये खेटे घालून कंटाळला आहे.
सर्वसामान्य शेतकऱ्यांना भिक नको पण, कुत्रं आवर अशी म्हणण्याची वेळ आली आहे. कारण विहीर मंजूर पूर्वी पाच ते दहा हजार रुपयाची माया गोळा केली जाते. शेतकरी काही बोलल्यास मी सरकारी नोकरदार नसून मला सामाजिक संस्थेने नेमले आहे. माझं कुणी काही करू शकत नाही. आम्ही एक शेतकऱ्यांची व्यथा विचारण्यासाठी गेलो असता मला आठ दिवसाला पाच हजार रुपये हप्ता वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावा लागतो, अशी भाषा ते वापरतात. त्यामुळे मस्तावलेल्या अधिकारांला त्वरित बडतर्फ करून खातेनिहाय चौकशी करावी.

असे न झाल्यास भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका यापुढे तीव्र आंदोलन करेन, असा इशारा देण्यात आला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
