पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकारामांच्या भेटीला आले अन् राजकीय एकनाथाला घेऊन गेले.

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आषाढी वारीची पूजा सौ. अमृतावहिनी व श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होण्याची शक्यता.

माळशिरस ( बारामती झटका )

भागवत धर्मातील संप्रदायाच्या मंदिराचा कळस असे संबोधले जाणारे संतश्रेष्ठ जगद्गुरू ह.भ.प. तुकाराम महाराज यांच्या देहू येथील विविध विकासकामे व तुकाराम महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाराष्ट्रात आलेले होते. महाराष्ट्राच्या राजकारणामधील शिवसेनेचे गटनेते ना. एकनाथजी शिंदे यांनी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानादिवशी वेगळी भूमिका घेतलेली असल्याने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी तुकाराम महाराजांच्या भेटीला आले आणि राजकीय एकनाथाला भाजपच्या प्रवाहात घेऊन गेले, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या आषाढी वारीची पूजा सौ. अमृतावहिनी व श्री. देवेंद्रजी फडवणीस यांच्या शुभहस्ते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भागवत धर्मातील संप्रदायाच्या मंदिराचा पाया श्री संत ज्ञानेश्वर यांनी रचला व त्यावर कळस श्री संत तुकाराम महाराज यांनी चढविला आहे. वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूर, देहू, आळंदी या धार्मिक स्थळांना अनन्य साधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रातून आषाढी वारीच्या वेळेला अनेक संतांच्या पालख्या वेगवेगळ्या धार्मिक स्थळापासून पायी चालत पंढरपूरला येत असतात. श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास महाराष्ट्रातून भाविक येत असतात‌. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संसर्ग रोगामुळे पालखी पायी वारी सोहळा रद्द करून शिवशाही एसटी ने वारी सोहळा आयोजित करून परंपरा खंडित होऊ दिली नव्हती. यंदा कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याने शासनाने पायी वारीचे आयोजन केलेले आहे.

सोमवारी दि. 20 जून रोजी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. त्याच दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले. भारतीय जनता पक्षाने संख्या बळावर चार विधान परिषदेचे आमदार निवडून येत असताना पाच आमदार निवडून आणलेले होते. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या आमदारांनी गटनेते एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रस्तावना दिवशीच बंडाचा झेंडा हातामध्ये घेऊन सुरत गाठलेली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचे संख्याबळ असताना काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व इतर यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलेले होते. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांनी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीच्या वेळी राजकीय करिष्मा दाखवून दिलेला आहे. देवेंद्रजी फडवणीस यांचे राजकीय पांडुरंग असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा राजकीय वरदहस्त कायम असतो. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देहू येथील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या भेटीला आल्यानंतर सुरुवात झालेली आहे आणि विशेष म्हणजे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थानादिवशी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय दिल्लीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे दक्षिणकाशी समजली जाणाऱ्या पंढरपूरच्या पांडुरंगाची आषाढीवारीची पूजा करण्याचा बहुमान सौ. अमृता वहिनी व श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना मिळेल, अशी अपेक्षा भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविधान परिषदेचे नवनियुक्त आ. श्रीकांतजी भारतीय यांचा सोलापूर जिल्हा प्रभारी के. के. पाटील यांच्या वतीने सन्मान.
Next articleविजय नलवडे यांचे प्रथम पुण्यस्मरण सामाजिक उपक्रमाने संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here