पुरवठा निरीक्षक, तहसीलदार यांची डोळेझाक, ग्रामस्थांची जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव, आंदोलन करण्याचा पवित्रा घेऊन प्रशासनाला जाग आणण्याचा ग्रामस्थांचा इशारा.
माळशिरस ( बारामती झटका )
पठाणवस्ती ता. माळशिरस येथील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे पुरवठा निरीक्षक तहसीलदार यांची डोळेझाक होत असल्याने त्रस्त कार्डधारकांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना फॅक्स तक्रारी अर्ज करुन स्वस्त धान्य दुकानदार यांच्या गैरकारभाराची चौकशी करून परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा पवित्रा घेऊन झोपलेल्या प्रशासनाला जाग आणली जाईल, असा इशारा ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच रशिदखान गफारखान पठाण यांनी दिला असल्याचे बारामती झटकाशी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकारी सोलापूर यांना दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे कि, सरकारने गोरगरिबांना माफक दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने प्रत्येक गावात चालू ठेवली आहेत. परंतु, सदर स्वस्तधान्य दुकानातील दुकानदार जनतेची पिळवणूक करून स्वस्तधान्य देण्याच्या दोन दिवस अगोदर गावातील निम्म्या लोकांचे मशीनवर हाताचे ठसे घेवून धान्य न देता परस्पर चढ्या भावाने विकण्याचे जिवंत उदाहरण मौजे पठाणवस्ती येथे घडले व घडत आहे.
मौजे पठाणवस्ती सरकारमान्य परवानाधारक दुकानदार मागील दीड वर्षांपासून कार्डधारक यांचे घरी मशीन घेवून घरोघरी माल दुकानात येण्याच्या दोन दिवस अगोदर कार्ड धारकांचे बोटांचे ठसे घेत आहे. व कार्ड धारकांना दोन दिवसांनी धान्य आल्यावर वाटप करतो अशी बनवाबनवी करीत आहेत. परंतु प्रत्यक्षात कार्ड धारक दोन दिवसांनी धान्य आणायला दुकानात गेल्यावर तुमचा माल तुम्ही कधीच घेवून गेला आहे. आता पुढच्या महिन्यात दुसरा माल येणार आहे. त्यावेळेस तुम्हाला माल देतो, आता घरी जावा, थांबू नका, अशी कार्डधारकांची फसवणूक करीत आहे. व आणलेला निम्मा माल काळ्या बाजाराने विकत आहे व राहिलेला निम्मा माल जवळच्या संबंधित लोकांना देत आहे. तसेच राहिलेल्या निम्म्या लोकांना माझ्याविरुध्द तक्रार कराल तर रेशन कार्डावरील धान्य मिळण्याचे कायमचे बंद करीन अशी धमकी देत आहे. सदर परवानाधारक दुकानदार यांची संपूर्ण दप्तराची चौकशी करून परवाना रद्द करावा व नवीन व्यक्तीस परवाना देण्यात यावा व रेशन कार्डधारकांची पिळवणूक थांबवावी अशी विनंती करण्यात आली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng