सरकोली (बारामती झटका)
16 मे हा महाराष्ट्र शासनाने पर्यटन दिन म्हणून साजरा करण्याचे आदेश काढलेले आहेत. मौजे सरकोली ता. पंढरपूर, जि.सोलापूर या गावात पर्यटनस्थळ विकासास चालना मिळावी व गावातील होतकरू तरूणांच्या, बेरोजगार तरूणांच्या शेतीवर कृषी पर्यटन क्षेत्र उभा करण्यास प्रोत्साहन मिळावे याकरिता दि.2/5/2022 रोजी श्री भैरवनाथ मंदिर सरकोली येथे डॉ.संजयकुमार भोसले (साखर उपायुक्त) यांच्या मार्गदर्शनाखाली व सरपंच श्री. शिवाजी दगडू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सरकोली कृषी पर्यटनस्थळ निर्मितीबाबत बैठक घेण्यात आली.
सरकोली गावाची लोकसंख्या सुमारे 7 हजार 500 आहे. गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ आहे. ग्रामदैवताची यात्रा चैत्र महिन्यात कालाष्टमीला भरते. यात्रेकरिता जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून एक ते दीड लाख भाविक दर्शनासाठी येतात. श्री भैरवनाथ मंदिर हे शासनाच्या तिर्थक्षेत्र विकास आराखड्यात क वर्गात समाविष्ट आहे. या माध्यमातून मंदिर परिसरात भव्य सांस्कृतिक मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी टाकी व शौचालय उभारण्यात आले आहे. उर्वरित काम निधीअभावी थांबले आहे.
गावास ऐतिहासिक महत्व आहे. जुने गाव माण, भिमा/चंद्रभागा नदीच्या संगमावर वसलेले आहे. जवळच जीवंत गोड पाण्याचा 24 तास वाहणारा झरा आहे. त्यास गावकरी गुप्त कृष्णा नदी या नावाने ओळखतात. नदी पात्राच्या 150 फुट उंचीवर मंदिर व गाव वसलेले आहे. यापूर्वी मोठमोठे महापुर भिमा व माण नदीस आले परंतू जुने गाव व मंदिर याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. हे निजामशाही, आदिलशाही व शिवस्वराज्याच्या अंमलात होते. औरंगजेबाची छावणी माचणूर, ब्रह्मपुरी येथे पडली असताना त्यांच्या काही सैनिकांच्या तुकड्या सरकोली हद्दीपर्यंत उतरल्या होत्या. हे गाव कासेगाव परगण्याच्या देखरेखीखाली होते. या गावावर परकीयांचे व स्वकीयांचे तीन वेळा आक्रमणे झाली. त्यावेळी गाव उध्दवस्त झाले होते. पेशवाईमध्ये सदर गाव पुर्ववत करण्यासाठी काही अंमल पेशव्याकडून भोसे परगण्याकडून पाठविण्याच्या सूचना / पत्र देण्यात आले होते. सदरचे पत्र ऐतिहासिक स्थळामध्ये उपलब्ध आहे.
दोन नदी संगमावर गाव वसल्याने समुद्रातील एखाद्या बेटाप्रमाणे दिसते. अशी नैसर्गिक स्थिती ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या परिसराचा विकास झालेला आहे व पर्यटन स्थळ निर्मिती झालेली आहे. हे गाव ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक डॉ. द. ता. भोसले, महाराष्ट्र शासन कृषी भुषण पुरस्कार मिळालेले प्रभाकर बाबुराव भोसले (बळीराजा शेतकरी मासिक संस्थापक संपादक), कापूस कोंड्याची गोष्ट या शॉर्ट फिल्मसाठी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त नितीन प्रभाकर भोसले, रयत शिक्षण संस्थेचे लोकल बॉडीचे आजीव सदस्य त्र्यंबक गणपत भोसले, जुन्या पिढीतील प्रसिध्द पैलवान कै. दगडू रघुनाथ भोसले, पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेचे आमदार कै. भारत तुकाराम भालके, सोमनाथ नंदू माळी (इस्त्रो केरळ येथे वरिष्ठ शास्त्रज्ञ), डाळींबरत्न पुरस्कार प्राप्त दत्तात्रय साहेबराव भोसले यांचे हे जन्मगाव आहे. हे गाव अधिकाऱ्यांचे, पैलवानांचे, उत्कृष्ट शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. सध्या या गावचे मुख्य पीक ऊस असून पंढरपूरी म्हैस या जातीच्या म्हशीचे गोठे आहेत व दुध संकलन ही मोठ्या प्रमाणात होते. नदीतील पाणी साठ्यामुळे मस्य व्यवसाय ही मोठ्या प्रमाणात चालतो.
या गावासाठी वाहतूकीचे रस्ते – हे गाव पंढरपूरच्या पुर्वेस 20 किलोमीटर असून सोलापूर शहराच्या पश्चिमेस 55 किलोमीटर आहे. 1) पंढरपूर ते रांझणी पुढे सरकोली 2) पंढरपूर ते रांझणी आंबे पुढे सरकोली 3) पंढरपूर ते रांझणी ओझेवाडी पुढे सरकोली 4) सोलापूर ते टाकळी सिकंदर पुळूज पुढे सरकोली 5) सोलापूर ते इंचगाव, देगाव, शंकरगाव पुढे सरकोली 6) मंगळवेढा ते उचेठाण पुढे सरकोली 7) सोलापूर हायवे ते ब्रह्मपुरी, बठाण, उचेठाण पुढे सरकोली 8) सोलापूर हायवे ते संत दामाजी साखर कारखाना ओझेवाडी पुढे सरकोली असे 8 रस्ते सरकोली गावाकडे येतात.
या गावाच्या कडेनी नदीवर कोल्हापूर पध्दतीचे बंधारे – गावाच्या पश्चिमेकडून पुर्व बाजूने भिमा / चंद्रभागा वाहते. तिच्या पात्राची रूंदी 400 मीटर आहे व गावाच्या हद्दीपर्यंत लांबी 11 किलोमीटर आहे. पात्रात पाण्याची पातळी सर्वसाधारण 40 फुट असते. गावाच्या पश्चिम बाजूने माण नदी वाहते. तिच्या पात्राची रूंदी 100 मीटर आहे व गावाच्या हद्दीपर्यंत लांबी 2.5 किलोमीटर आहे.पात्रात पाण्याची पातळी सर्वसाधारण 20 फुट खोलपर्यंत आहे. गावाच्या दक्षिण बाजूला माण नदी पात्राच्या कडेला जीवंत पाण्याचा 24 तास वाहणारा झरा आहे. त्याचे पाणी गोड आहे. तो झरा कधीही अटला नाही. 1) माण नदीवर खंडोबा मंदिरजवळ सरकोली हद्दीत मोटारसायकल वाहतूकीचा पाणी साठवण कोल्हापूर पध्दतीचा बंधारा आहे. 2) सरकोली हद्द मुढवी गावाजवळ मोटारसायकल वाहतूकीचा पाणी साठवण बंधारा आहे. 3) उचेठाण, आंबेचिंचोली हद्द मंगळवेढा पाणी पुरवठ्याचा व चारचाकी वाहतूकीचा पुल + बंधारा आहे. 4) सरकोली हद्द पुळूज गावाजवळ चारचाकी वाहतूकीचा पाणी साठवण बंधारा आहे.
सरकोली गावच्या हद्दीमध्ये गावाच्या कडेला असे एकूण 4 कोल्हापूर पध्दतीचे पाणी साठवण व वाहतूकीचे बंधारे आहेत. यातील उचेठाण हद्द व पुळूज बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साठा केला जातो. इथे नदी पात्राची लांबी रूंदी ही मोठ्या प्रमाणात आहे. या बंधाऱ्यातील पाणी बॅकवॉटरने मोठ्या प्रमाणात पसरलेले असते. त्यामुळे इथे पर्यटकांसाठी नौका विहार, बनाना बोट, जेट स्की, पॅरासिलिंग, सी वॉटर राफटिंग, काईट सर्फिंग, कॅनॉईंग वॉटर स्कूटर, स्पीड बोट, कयार्किंग, पॅडल सर्फिंग, पॉवर बोट इत्यादी व्यवस्था पर्यटकांसाठी करून देता येते व साहसी खेळाडूंच्या स्पर्धेकरिता स्पर्धकांना या पाण्याचा उपयोग करून घेता येतो. या नदी पात्रातील मासे पर्यटकांसाठी खाद्य मेजवाणी म्हणून उपयोग करता येईल. या गावात इतर गावांमध्ये सरासरी पावसाचे प्रमाण जास्त आहे.
सरकोली गावास भिमा व माण नदीचा किनारा मोठया प्रमाणात मिळाल्याने युवकांना वैयक्तिकरित्या स्वत:च्या शेतीवर शासनाच्या धोरणानुसार, कृषी पर्यटन उभे करता येते. नदी किनाऱ्यावर नारळ, सुपारी, चिक्कू, काजू, आंबा, पेरू, सिताफळ, केळी, अंजीर, स्ट्रॉबेरी व सुगंधी फुलांची वृक्षवेली झाडे लागवड करून कोकणाचे सौंदर्य प्राप्त करता येते. गावात पंढरपुरी म्हशीचे गोठे मोठ्या प्रमाणात आहेत. म्हशीच्या दुधाची प्रक्रिया करून पर्यटकांना दुग्धजन्य पदार्थ स्वस्तात उपलब्ध करून देता येतात. गावाची शेतजमिनीवर ऊस पीक भरपूर प्रमाणात आहे. त्याचे गुऱ्हाळ करून पर्यटकांना रस, काकवी, गुळ, गुळपट्टी स्वस्तात उपलब्ध करून देता येईल. तसेच केळीच्या बागा भरपूर प्रमाणात असल्याने केळीपासून चिप्स व इतर उपपदार्थ बनविता येतील.

गावास भिमा व माण नदीच्या पात्रातील पाण्याचा उपयोग पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी व साहसी पर्यटन स्पर्धा या उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन निर्णयानुसार कृषी पर्यटन राबविण्याच्या उद्देशाने पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी राज्याच्या पर्यटन योजनेत भर पडावी या उद्देशाने व पर्यटनातून ग्रामीण विकास, शेती उत्पादनांना बाजारपेठ, कृषीपुरक व्यवसायांना चालना, ग्रामीण भागातील लोककला व परंपरेचे दर्शन घडविणेसाठी, महिला व तरूणांना गावातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, शहरी भागातील लोकांना, विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पध्दती तसेच कृषी संलग्न व्यवसायाची माहिती होणेकरिता ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणेकरिता पर्यटकांना प्रदुषणमुक्त व शांत निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव येणेकरिता शेतीवरील कृषी मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन मिळणेकरिता गावातील पाझरपड, शारपड जमिनी उपयोगात आणणेकरिता व सरकोली गावास राज्यामध्ये पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होणेकरिता खालील नियोजित कामे शासकीय योजनेमधून होणे गरजेचे आहे.
1) भिमा नदी व माण नदीवर चार घाट बांधकाम करणे. 2) जुन्या गावाच्या कडेनी भिमा व माण नदीच्या काठांनी सर्वसाधारण पुर रेषेच्या बाहेर रिंगरूट रस्ता तयार करणे. 3) सरकोली ता.पंढरपूर गावाकडे येणारे जि.प. व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिपत्याखालील रस्ते रूंदीकरण व दुरूस्ती करणे. 4) भिमा व माण नदीवरील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे 10 फुट उंच करून त्यास पुलाचे स्वरूप देणे.5) पाण्याचा अपव्याप टाळावा व नदी तिरावरील शेतजमिनीत फळबाग लागवड होणेसाठी राज्याच्या फल्पोदन धोरणानुसार नारळ, सुपारी, चिक्कू, काजू, अंजीर, पेरू, सिताफळ, स्ट्रॉबेरी, केळी या बागा लागवडीस शासकीय अनुदान मिळावे. 6) ज्येष्ठ ग्रामीण साहित्यीक डॉ.द.ता.भोसले यांचे जन्मगाव सरकोली आहे. या गावास साहित्यीकाचे जन्मगाव असा विशिष्ट दर्जा देवून पर्यटक, साहित्यप्रेमीस गावात साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता त्यांच्या जन्म ठिकाणावर मोठी इमारत व त्या इमारतीत विविध कक्षांची निर्मिती करणेकरिता शासनाकडून निधी मिळावा. 7) भिलार गावासारखे पुस्तकांचे गाव या सदराखाली पर्यटकांना प्रत्येक ठिकाणावर साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी विशेष अनुदान मिळावे. 8) युवकांना स्वत:च्या शेतामध्ये कृषी पर्यटन उभा करणेकरिता त्यांना प्रशिक्षण व राष्ट्रीयकृत बॅंकांकडून कर्ज मंजूरी उपलब्ध होवून मिळावे.9) श्री भैैरवनाथ तिर्थक्षेत्र हे “क’ वर्गात आहे. ते “ब’ वर्गात समाविष्ट करा. 10) गावामध्ये पर्यटकांसाठी कोकण धर्तीवर नैसर्गिक घरांची निर्मिती करावी व हॉटेल, लॉजिंग, पार्कींग व्यवस्था निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावे. 11) सरकोली गावचे पर्यटन स्थळ निर्मिती संदर्भाने शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थळ पाहणी करावी.
सोलापूर जिल्ह्यातील व राज्यातील पर्यटनप्रेमींना पर्यटनासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाने अधिकाधिक लक्ष घालून सरकोली गाव लवकरात लवकर पर्यटनस्थळ निर्मिती व्हावी अशी गावकऱ्यांची इच्छा आहे.
संकलन व लेखन :
श्री.विलास श्रीरंग भोसले (माजी पोलिस कर्मचारी) मोबा.9923433535
संस्थापक : ज्येष्ठ साहित्यीक डॉ.द.ता.भोसले जिव्हाळा परिवार, पंढरपूर

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng